जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ, खंडेरायाच्या देवदिवाळीला उत्साहात सुरवात
जेजुरी गडावर घटस्थापनेने चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ झाला आहे. खंडेरायाच्या देव-दिवाळीला उत्साहात सुरवात झालीये.
जेजुरी (पुणे) : जेजुरी गडावर घटस्थापनेने चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ झाला आहे. खंडेरायाच्या देव-दिवाळीला उत्साहात सुरवात झालीये. हा उत्सव सहा दिवस चालणार आहे. कोरोनाचा काळ असल्याने देवस्थान आणि प्रशासनाने भाविकांनी घ्यावी काळजी घ्यावी, असं आवाहन केलं आहे. (ChampaShashti Festival Start in jejuri)
महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या श्री खंडोबाला सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत मानलं जातं, त्याला पूजलं जातं. अश्विन महिन्यात जसा देवीचा नवरात्र उत्सव असतो तसा हा खंडेरायाचा सहा रात्रींचा उत्सव असतो. खंडेरायाच्या गडावर घट स्थापन करुन साजऱ्या होणा-या ‘चंपाषष्ठी’ महोत्सवाला अर्थात खंडेरायाच्या ‘देवदिवाळी’ला आजपासून उत्साहात सुरवात झाली आहे.
उत्सावाच्या त्यानिमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. गडावर सहा दिवस-रात्री ‘चंपाषष्ठी’ हा महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो गडावर कोव्हिड नियम पाळून शेकडोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.
कोरोना महामारीमुळे सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी गडावरती संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता संचारबंदी उठवण्यात आलेली असून आजपासून चंपाष्ठमी उत्सवानिमित्त सर्व भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन भाविकांनी करावे अशी ही विनंती देवस्थान समितीकडून करण्यात आलेली आहे.
“गडावर भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं. विना मास्क जेजुरी गडावर प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांना मास्क परिधान करणे अनिवार्य असणार आहे. जो व्यक्ती मास्क परिधान करणार नाही त्याच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 500 रुपये दंड वसूल केला जाईल. तसंच जेजुरीतील आस्थापनांना देखील नियम घालून दिलेले आहेत. ज्या आस्थापना हे नियम मोडतील. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल”, असा इशारा जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिला आहे.
खंडोबाच्या जेजुरीत 12 ते 14 डिसेंबर पर्यंत भाविकांना दर्शन घेता आले नाही. या काळात जेजुरीत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. त्यामुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला पालखी सोहळाही रद्द करण्यात आलेला होता.
जेजुरी हे राज्यासह परराज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाचं मंदिर असलेलं शहर आहे. जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील लाखो भाविक इथं येत असतात.जेजुरी हे अवघ्या महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथं येणाऱ्या भाविकांना सोईसुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असतात.
(ChampaShashti Festival Start in jejuri)
संबंधित बातम्या
सोमवती यात्रेनिमित्त सोन्याच्या जेजुरीत जमावबंदी; 12 ते 14 डिसेंबरपर्यंत भाविकांसाठी बंद