‘मी माझ्या वक्तव्यावर ठाम, …तर पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत’; चंद्रहार पाटील पुन्हा संतापले
या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना अहिल्यानगरमध्ये पार पडला. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली. मात्र या स्पर्धेत पंचांनी दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला

या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना अहिल्यानगरमध्ये पार पडला. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली. मात्र या स्पर्धेत पंचांनी दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला आणि स्पर्धेला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. महाअंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने होते. मात्र महेंद्र गायकवाड याने सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडलं. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आलं.
त्यापूर्वी उपांत्य फेरीमध्ये शिवराज राक्षे आणि पंचांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी शिवराज राक्षे याने पंचाची कॉलर पकडली, तसेच त्यांना लाथ देखील मारली. याची गंभीर दखल, कुस्तीगीर परिषदेकडून घेण्यात आली असून, महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांचं प्रत्येकी तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
दरम्यान आता या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या वादात डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. या प्रकरणावर बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘शिवराज राक्षे याने पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं मत आहे, असं वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलं आहे. चंद्रहार पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत, त्यातच त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करताना आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रहार पाटील?
मी आज सकाळी जे वक्तव्य केलं आहे, त्या वक्तव्यावर मी आता सध्याही ठाम आहे. पंचाच्या एका निर्णयामुळे पैलवानाचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होत असते, त्यामुळे पंचानी जो चुकीचा निर्णय दिला आहे, त्याचा मी आताही विरोध करतोय. 2009 साली माझ्या बाबतीत ही असाच अन्याय झाला होता, त्याची पुनरावृत्ती पुन्हा 2025 ला झाल्यामुळे मी हे वक्तव्य केलं आहे.
शिवराज राक्षेला बंदी घातली आहे, तो निर्णय मागे घेतला नाही तर त्या पंचाला जाऊन गोळ्या घातल्या पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कुस्तीत राजकारण घुसले आहे, पण मी त्याला किंमत देत नाही. पैलवान पडलेला नसतानाच शिट्टी वाजून निर्णय देत असाल तर दम असलेला पैलवान तरी काय करणार? ज्यात दम असतो आणि जो कष्ट करतो तो महाराष्ट्र केसरी होतोच.
महाराष्ट्र केसरी या किताबला महाराष्ट्रामध्ये फार महत्त्व आहे, कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषद यांनी एकत्र येऊन एकच महाराष्ट्र केसरी घेतली पाहिजे, याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी देखील यावेळी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केली आहे.