शिवसेना खासदारांनी युतीधर्म पाळला नाही : चंद्रकांत पाटील
विधानसभा निवडणूक निकाल (Maharastra Assembly Election Result) लागला असला तरी निकालावरील मंथन संपलेलं नाही.
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक निकाल (Maharastra Assembly Election Result) लागला असला तरी निकालावरील मंथन संपलेलं नाही. भाजप-शिवसेनेने निवडणूक पूर्व युती केली असली तरी निवडणूक काळात दोन्ही पक्षांकडून अनेक ठिकाणी बंडखोरी आणि गटबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil on Shivsena) विधानसभा निवडणुकीत शिवसेना खासदारांनी भाजपला कोल्हापूरमध्ये मदत न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते आज (27 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपने निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं आणि मित्रपक्षांना मदत केली. मात्र, कोल्हापूरमध्ये शिवसेना खासदारांनी भाजपला मदत केली नाही. आम्ही त्यांना युती धर्म पाळा अशा सक्त सूचना दिल्या आहेत.”
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यावरही निशाणा साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही आमच्यातील काही अपप्रवृत्तींचं चिंतन करु. मात्र, सोयीचं राजकारण करणारी जी खासदार संजय मंडलिक नावाची प्रवृत्ती आहे तिचा शिवसैनिकांनी विचार करावा. 5 वर्षांपुर्वी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कागल नगरपालिकेत देखील शिवसेनेने राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्यासोबत युती केली. तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवता मग ते राष्ट्रवादीसोबत कसे गेले?”
लोकसभेपर्यंत आम्हाला चांगलं यश मिळालं. त्या तुलनेत आता मिळालं नाही. याचं आम्ही आत्मचिंतन करू, असंही चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं. तसंच ज्यांनी टोल आणला ते विजयी आणि आम्ही टोल घालवला तर आम्ही पराभूत असं का? आमचं कुठं चुकलं असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांना विचारला.
भाजपला यश मिळलं तेव्हा ईव्हीएमला दोष देण्यात आला आता विरोधक ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणार का? असा टोलाही पाटील यांनी विरोधकांना लगावला. तसेच अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे घेतील, असंही सांगितलं.