मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल, पाटलांची टोलेबाजी, रश्मी ठाकरेंवर नेमकं काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या.
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बहुदा मुलगा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही विश्वास नाही. त्यामुळे ते त्यांच्याकडेही मुख्यमंत्रीपदाचा चार्ज देत नाहीयत, अशी जोरदार टोलेबाजी बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदाट टीकाही केली.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य नाही
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
बहुदा आदित्यवरही विश्वास नाही…
मग आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यायला त्यांना हरकत काय आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते, असे विचारले असते चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी परीक्षा घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी केली. ते म्हणाले, राज्याच्या पोलीस किती सक्षम आहेत ते दिसलं. इतक्या मोठ्या प्रमाणात स्कॅम आहे. तो बहुदा मंत्रालयापर्यंत येऊन भिडतो आहे. एका मंत्र्याचे नाव अस्पष्टपणे यायला सुरुवातपण झालीय. अशावेळी महाराष्ट्र पोलीस कशी काय चौकशी करणार. त्यामुळे आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शेवटी लोकशाहीमध्ये आम्हाला काही मागणी करण्याचा अधिकार तरी आहे की नाही. की तोंडं दाबून ठेवणार आहात. तुम्हाला काय करायचे ते करा. आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रपती राजवटीची कारणे घडली
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रपती राजवट येणं हे काही स्वप्न असू शकत नाही. ती येण्यासाठी सगळी कारणं घडलेली आहेत. तरीही राष्ट्रपती राजवट आणायची की नाही, हा केंद्राचा विषय आहे. त्यामुळे एखादी गोष्ट चुकीची असली, व्यवहारात येणारी नसली की ती स्वप्नात बघायची असते. ती व्यवहारातच आली पाहिजे, असे उत्तरही त्यांनी यावेळी दिले. मोदींचे मुखदर्शन झाले नसले. ते संसदेत आले नसले तरी सगळ्या बाजूंनी ते अॅक्टीव्ह आहेत. ते सहीला अव्हेलेबल नाही. लोकांना अव्हेलेबल नाहीत, असे नाहीय. माझा मुद्दा आहे तो प्रामुख्याने राज्य शासन हे विदाऊट मुख्यमंत्री चालणार नाही. इथे तुम्ही लोकांना, सहीला आणि आमदारांना उपलब्ध नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही ते म्हणाले.
इतर बातम्याः