चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्षपदी कायम, मुंबई अध्यक्षांचीही फेरनिवड!
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra president Chandrakant Patil) यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra president Chandrakant Patil) यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केली. चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भाजपचे अध्यक्षपद सांभाळतील, तर आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनाही पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे. (BJP Maharashtra president Chandrakant Patil)
भाजपच्या प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत अनेकांची नावं होती. मात्र राज्यातील फडणवीस सरकार सत्तेतून गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा होती. विशेष म्हणजे याआधी प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे अशी मोठी नावं चर्चेत होती. संघाच्या जवळच्या नेत्यांकडेच प्रदेशाध्यपद द्यावं, असा संघ नेत्यांचा सूर होता. मात्र चंद्रकांत पाटील अमित शाहांच्या जवळचे असल्यानं पाटलांचीच वर्णी लागणार असल्याचं बोललं जातं होतं. त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे.
2013 मध्ये चंद्रकांत पाटलांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2014 मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवत विधानपरिषदेत त्यांनी पुन्हा प्रवेश केला. 2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम या विभागांची सूत्रे सोपवण्यात आली होती.
2016 पासून चंद्रकांत पाटील महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री होते. दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा कार्यभार सोपवला होता.
तत्कालीन भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जुलै 2019 मध्ये चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या, विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून पुढे आलेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांची पुन्हा भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. तर मुंबई अध्यक्षपदी पुन्हा आ. मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती झाल्याबद्दल दोघांचेही खूप खूप अभिनंदन! pic.twitter.com/TbKK45q3wo
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 13, 2020
चंद्रकांत पाटील यांचा अल्प परिचय
चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थी चळवळीपासून राजकारणात प्रवेश केला. ते मितभाषी स्वभावासाठी ओळखले जातात. संघटन बांधणीत त्यांचं मोठं योगदान आहे. उत्तम संघटन बांधणी आणि काटेकोर नियोजन या चंद्रकांतदादांच्या उजव्या बाजू आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अमित शाहांचे सर्वात विश्वासू नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.
हायकमांडचीही चंद्रकांत पाटील यांच्याच नावाला पसंती असल्याचं सुरुवातीपासून म्हटलं जात होतं. परंतु देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याच्या चर्चांना सुरुवात झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती होण्याची अटकळ बांधली जात होती
मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा
दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांनाही मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोढा यांच्याऐवजी आशिष शेलार यांच्याकडेच मुंबई भाजप अध्यक्षपद देण्याची चर्चा होती. मात्र त्याही फेटाळून लावत, भाजपने लोढा यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.
कोण आहेत मंगलप्रभात लोढा?
मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिक आहेत. 64 वर्षीय लोढा हे मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले आहेत. गेली अनेक वर्ष मलबार हिलवर लोढा यांच्या रुपाने भाजपचं वर्चस्व राहिलं आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, जुलै 2019 मध्ये मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजप मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. आशिष शेलारांना मंत्रिपद दिल्यानंतर शेलारांकडील जबाबदारी त्यावेळी लोढांकडे सोपवण्यात आली होती. परंतु निवडणुकीत भाजपला धक्का बसल्यानंतर अवघ्या लोढांना हलवण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.