…तर टिळकांच्या घरात उमेदवारी द्यायला पक्ष तयार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन नेमकं काय?
आधी कुलकर्णी, नंतर टिळक आणि पुढील नंबर बापटांचा का ? असा मजकूर असलेले बॅनरही पुण्यात झळकू लागल्याने भाजपमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून (BJP) दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना संधी देण्यात आली आहे. तर कसबा पेठमधून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या ऐवजी हेमंत रासणे (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच जागेवर भाजपकडून शैलेश टिळक (Shailesh Tilak) हे देखील इच्छुक होते. त्यामुळे कसबा पेठ या मतदार संघात भाजपने अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात असतांना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शैलेश टिळक यांच्या उमेदवारीवरुन मोठं भाष्य केलं आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये एक न्याय आणि कसबा पेठमध्ये वेगळा न्याय अशी चर्चा पुण्यात सुरू झाली आहे. त्यातच ब्राम्हण समाजावर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
आधी कुलकर्णी, नंतर टिळक आणि पुढील नंबर बापटांचा का ? असा मजकूर असलेले बॅनरही पुण्यात झळकू लागल्याने भाजपमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला होता.
पिंपरीत जगताप यांच्या घरात उमेदवारी दिली पण कसबा पेठमध्ये टिळक यांच्या घरात का उमेदवारी दिली नाही असा सवाल करत कॉंग्रेस निवडणूक लढणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे.
तर दुसरिकडे हाच मुद्दा घेऊन चंद्रकांत पाटील यांनी टिळकांच्या घरात उमेदवारी देतो तुम्ही निवडणुकीतून माघार घ्या अशी अट घातली होती, त्यावर स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाष्य केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या मताशी पक्ष सहमत आहे. टिळक यांच्या घरात उमेदवारी द्यायला तयार आहे. महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध करावी.
महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांशी आम्ही बोलू, विनंती करू. सात-आठ महिन्यासाठी कशाला निवडणुका घेतात, कुणीही जाणीवपूर्वक निवडणूक लावत नाहीये, त्यामुळे निवडणुका बिनविरोध कराव्यात.
पक्षात कुणीही कुणाला डावलत नाही, ब्राह्मण समाजाने पक्षासाठी आयुष्य दिलं आहे. पक्षानेही ब्राह्मण समाजाला खूप काही दिलं आहे. पक्षात आधी ब्राह्मण समाज आणि नंतर ओबीसी समाज आहे असंही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.
महाविकास आघाडी एक पाऊल मागे आल्यास आम्ही एक पाऊल मागे येऊ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं असून बिनविरोध निवडणुकीचा चेंडू आता कॉंग्रेसच्या कोर्टात गेला आहे.