‘उद्धव ठाकरे पुढे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्षही होतील’; बावनकुळेंचा पुन्हा खोचक टोला
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुढच्या काळात ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. उद्धव ठाकरेंचे खासदार जेव्हा निवडून आले, तेव्हा त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे होते, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे याचं हिंदुत्व पायदळी तुडवलं, मतांच्या लांगुलचलनासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. म्हणून मी म्हटलं होतं उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत, पुढच्या काळात ते औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होतील असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांचं मला काही ऐकू येत नाही, महाराष्ट्राच्या जनतेनेही त्यांना एकेनं सोडलेलं आहे, त्यामुळे संजय राऊत यांच्यावर बोलून काही फायदा नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी दिशा सालियन प्रकरणावर मात्र बोलणं टाळलं आहे. अंतिम रिपोर्ट येईपर्यंत यावर जर काही बोललो तर ते घाई-घाईत बोलल्यासारखं होईल, विषय डायव्हर्ट होऊ शकतो असं बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये, यावर देखील यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी लवकरच बैठक होईल. त्या बैठकीला एकनाथ शिंदे,अजित दादा आणि मी देखील उपस्थित असणार आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोनही पक्षांकडून दावा करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर देखील जोरदार हल्लाबोल केला. 2047 पर्यंत माननीय शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे यांना आणि काँग्रेसला काही वाव नाही. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने 2047 पर्यत वाट बघावी. त्यांनी विरोधी पक्षात काम करावं मी त्यांना शुभेच्छा देतो, असा खोचक टोला यावेळी बावनकुळे यांनी लगावला आहे.