Nandurbar : सत्ताधारी विरोधात जातो तेव्हा तो बावचळलेला असतो, सत्तेतून गेलोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही, बावनकुळेंचा टोला
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना धारेवर धरलs आहे. पितृपक्ष आणि मंत्रीपदाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नंदुरबार : सर्व मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. मात्र विरोधकांना हे दिसत नाही. सत्ताधारी पक्ष जेव्हा विरोधी (Opposition) पक्षात जातो तेव्हा तो बावचळलेला असतो. त्यांना आपण सत्तेतून गेलो आहोत, हे लक्षातच येत नाही, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विविध नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. मंत्र्यांनी आपल्या खात्याची सुत्रे हाती घेतली नसल्याची टीका सातत्याने करण्यात येत आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, की मी स्वतः पाहिले आहे, की सर्व मंत्री कामाला लागले आहेत. तसेच आधीच्या सरकारपेक्षा या सरकारची कामाची गती चांगली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
‘हे विचारण्याचा त्यांना अधिकार आहे का?’
अजित पवारांवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की त्यांनी आधी सांगावे, की पहिले 18 महिने तुमचा मुख्यमंत्री मंत्रालयात का आला नाही? त्यामुळे त्यांना हे विचारण्याचा अधिकार आहे का? त्यांनी आधी स्वतःच्या चुका पाहाव्यात, असा टोला अजित पवारांना लगावला आहे. आधीचे तीन चाकी रिक्षा आणि आताचे बुलेट ट्रेनचे सरकार यात फरक असल्याचा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
‘आधी स्वतःच्या चुका पाहाव्यात’
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना धारेवर धरले आहे. पितृपक्ष आणि मंत्रीपदाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीने त्यांच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयात का आले नाही? उद्धव ठाकरे यांना फक्त फेसबुकवरच पाहत होतो, असा सवाल बावनकुळेंनी केला. तसेच मविआने आधी स्वतःच्या चुका पाहाव्यात, असाही सल्ला त्यांनी नंदुरबार येथे दिला.
काय म्हणाले होते अजित पवार?
पितृपक्ष असल्याने बर्याच मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारलेला नाही. बरेच मंत्री मंत्रालयाच्या कार्यालयात गेले नाहीत, असे अजित पवार म्हणाले होते. याबाबत बातम्यांची कात्रणेही त्यांनी दाखवली होती. जग कुठे चालले आहे आणि आपण काय करत आहोत, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.