“2024 ला बघू कुणाच्या पायाखालची वाळू सरकते” चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हाडांना प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर साथ देतील, असं बावनकुळे म्हणालेत.
मुंबई : “बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे!”, असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. त्याला आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जितेंद्र आव्हाडांना जे बोलयाचं आहे ते बोलू द्या. 2024 ला बघू निवडणुका होतील त्यावेळेस बघू कुणाच्या पायाखालची वाळू सरकते. कोण उध्वस्त होतंय हे कळेलच की…,”, असं बावनकुळे म्हणाले आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर साथ देतील, असंही ते म्हणालेत.
मिशन बारामतीवर बावनकुळे म्हणाले…
आमचं मिशन मुंबई अथवा मिशन बारामती ही नाही. आम्ही पूर्ण ताकतीने एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप युती करूनच लढणार आहोत. मला विश्वास आहे की महाराष्ट्र पुन्हा ती चूक करणार नाही. याआधी आमच्यावर राज्याने विश्वास दाखवला इथून पुढं ही दाखवतील. मधल्या काळात दगाफटका झाला. तो ही राज्याने पाहिला, पण आता तसं होणार नाही. कारण शिंदे आणि फडणवीस हे वर-वर एकत्र नाहीत ते अंतरमनाने जोडले गेलेत. शिवाय तळातील शिवसैनिक सुद्धा शिंदेंच्या पाठीशी असल्याचं मी पाहिलंय, असं बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे गेल्यामुळे ठाण्याच्या लोकसभा मतदारसंघाची जागा कुणाकडे असणार याबद्दल चर्चा होत आहे. त्यावर बावनकुळे बोलते झाले.
“भाजपने ठाणे लोकसभा आपल्याकडे असावी असा दावा केलेला नाही. आम्ही संघटनात्मक ताकद वाढवत आहोत. शिंदे जो उमेदवार देतील त्यांचंच भाजप काम करेल. एकनाथ शिंदे लोकसभेसाठी जो उमेदवार देतील त्यास भक्कम पाठिंबा देण्यासाठी भाजप तिथं काम करतंय”, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.