राहुल गांधी, तुम्ही महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी… चंद्रशेखर बावनकुळे यांचा काय इशारा?
सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद संपुष्टात आल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलंय.
गजानन उमाटे, नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांची मोट पक्की बांधण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत. याच मालिकेतील एक मोठी बातमी हाती आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लवकरच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी येणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी-उद्धव ठाकरेंच्या भेटीच्या बातमीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर भाजप नेतेदेखील सतर्क झाले आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावरून प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असतील तर इथं पाय ठेवण्यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्या प्रकरणी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय.
काय म्हणाले बावनकुळे?
राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीची बातमी धडकल्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळ अपमान केला. आताही त्यांची भुमिका बदलली नाही. त्यांनीमाफी मागीतली नाही. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी, मगंच महाराष्ट्रात पाय ठेवावा. उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
राज्यात चर्चा गांधी-ठाकरे भेटीची
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला होता. सावरकरांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाहीत, असं म्हटलं होतं. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडते की काय अशी शक्यता होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर काँग्रेस सावरकरांचा मुद्दा पुन्हा मांडणार नाही, असं आश्वासन मिळाल्यांचं समजतंय. त्यामुळे तूर्तास तरी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद संपुष्टात आल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलंय.
दोन्ही सालस, समजदार नेते..
दरम्यान, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘ राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची जर भेट होत असेल तर ही एक चांगली गोष्ट आहे. दोन्ही नेते अतिशय सालस आहे दोन्ही नेत्याचा एकच उद्देश संविधान वाचावे.. ते वाचवण्यासाठी जे करावे लागलं ते करायलाही हे नेते तयार आहेत. मी या गोष्टीला सर्व पॉझिटिव्ह घेते दोन्ही समजदार आणि सालस नेतृत्व आहे.जे काही ते निर्णय घेतील ते या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी फायदेशीर असेल…