धमक्यांचं सत्र सुरूच, मुख्यमंत्र्यानंतर आता शिंदे गटातील ‘या’आमदाराला निनावी पत्र, संभाजीनगरात खळबळ
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारणार असल्याचा फोन पोलीस कंट्रोल रुमला आला होता. रात्रीच्या सुमारास आलेल्या या फोनमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली.
दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकानंतर एक राजकीय नेत्यांना धमक्या मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून धमक्यांच हे सत्र सुरु आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, आता शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या संभाजीनगरात (Sambhajinagar) अशी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकीचं पत्र आलंय. राज्यातील काही नेत्यांना थेट मोबाइलवर फोन, संदेशाद्वारे धमकी मिळाली. तर बोरनारे यांच्या नावाने नुकतंच एक निनावी पत्र आलंय. या पत्रातून त्यांना जीवानिशी मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजीनगर शिवसेनेत यामुळे खळबळ माजली आहे.
पोस्टाने आले निनावी पत्र
आमदार रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी बंड केल्यानंतर त्यांनीही आधी सूरत आणि नंतर गुवाहटी गाठलं होतं. संभाजीनगरातील वैजापूर मतदार संघावर त्यांची पकड आहे. रमेश बोरनारे यांच्या घरी नुकतंच एक निनावी पत्र आलंय. या पत्राद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बोरनारे यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती वैजापूर पोलिसांना दिली आहे. वैजापूर पोलिसांकडून सदर पत्र कुणी पाठवलं असेल, याचा तपास सुरु आहे.
राजकीय वैमनस्य की खोडसाळपणा?
आमदार रमेश बोरनारे हे यापूर्वी अनेक कारणांनी चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदे यांचं बंड होण्यापूर्वी भावजयीलाच मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भाजपच्या कार्यक्रमाला गेली म्हणून आमदार बोरनारे यांनी त्यांना मारहाण केली होती, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धमकी
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारणार असल्याचा फोन पोलीस कंट्रोल रुमला आला होता. रात्रीच्या सुमारास आलेल्या या फोनमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. हा फोन पुण्यातून आल्याचे दिसून आले. पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने हा फोन केल्याचं उघडकीस आलं. मुंबई आणि पुणे पोलिसांच्या सतर्कतेने या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचणे सोपे झाले.
तर नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आलेल्या धमकी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणारा जयेश पुजारी सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. पुजारी याचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. बेळगाव जेलमधून सुटण्यासाठी जयेश पुजारीने मोठा प्लॅन आखला होता, अशीही माहिती समोर येत आहे.