गिरीश बापट यांच्या प्रचारावरुन भुजबळ यांनी भाजपला डिवचलं, म्हणाले मतदानाला ठीक होतं पण हे…
गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केलं आहे. पाहून वाईट वाटलं. मला त्यांच्या तब्येती बद्दल कल्पना नव्हती पण वाचनात आल्यानंतर खूपच वाईट वाटलं असंही छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.
उमेश पारिक, टीव्ही 9 मराठी, लासलगाव : राज्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदार संघाची पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी भाजपचे विविध नेते हे पुण्यात ठाण मांडून आहे. त्याच दरम्यान भाजपचे खासदार तथा कसबा पेठ मतदार संघात पाच वेळा आमदार म्हणून राहिलेले गिरीश बापट ( Girish Bapat ) हे प्रचाराला दिसले होते. त्यावरून विरोधी पक्षांनी गिरीश बापट यांना भाजपने प्रचारासाठी आणले म्हणून जोरदार टीका सुरू केली आहे. गिरीश बापट हे आजारी असतांना प्रचाराला आलेले पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ ( Chhagan Bhujabl ) यांनीही टीका केली आहे.
भाजपचे खासदार गिरीश बापट यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नाहीये. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच दरम्यान त्यांना व्हीलचेअरवर आणण्यात आले. ऑक्सिजनसह ऑक्सीमीटरही लावण्यात आलेले होते.
त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये छगन भुजबळ म्हणाले मी सुद्धा गिरीश बापट यांना पाहिलं नव्हतं, त्यांची आत्ता अवस्था झाली आहे.
गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केलं आहे. पाहून वाईट वाटलं. मला त्यांच्या तब्येती बद्दल कल्पना नव्हती पण वाचनात आल्यानंतर खूपच वाईट वाटलं. त्यात भाजपाला पराभव दिसू लागल्याने त्यांनी त्यानं प्रचाराला आणले.
भाजपाला पाठीमागच्या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने ही निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे. त्यामुळे त्यांनी गिरीश बापट यांना प्रचाराला आणलेले दिसत आहे.
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी आणलं होतं इतपर्यंत ठीक होतं. पण आता प्रचाराला आणणे मला फार आश्चर्य वाटलं, आपण साधं पाळण्याला हात लावला तर लगेच बोलतो हे त्यापेक्षा भयानक दिसत आहे आणि आजारी माणसाला काम करायला लावतोय.
अशी टीका छगन भुजबळ यांनी करत भाजपला चिमटे काढले आहे. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीही याबाबत टीका केली असून भाजपवर निशाणा साधला आहे. पुण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीच सुरुवातीला टीका केली होती.
त्यानंतर अजित पवार यांनीही भाष्य करत गिरीश बापट यांना भाजपने प्रचाराला आणणे योग्य नसल्याचे म्हंटले आहे. खरंतर गिरीश बापट हे कसबा मतदार संघात पाच वेळा आमदार राहिले आहे. त्यामुळे बापट यांचा या मतदार संघात वरचष्मा राहिला असून बापट यांच्याभूमिकेवर मोठी गणितं अवलंबून आहे.