अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानावरून वाद, छगन भुजबळ म्हणाले, आता बस्स्…!
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला. त्यावर छगन भुजबळ यांनी आपलं मत मांडलंय. ते काय म्हणालेत? पाहुयात..
नाशिक : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Statement) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला. त्यावर राष्ट्रावादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपलं मत मांडलं आहे. या प्रकरणावर पडदा टाकण्यात यावा, असं भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणालेत.
अजित पवार यांच्या विधानावरून मागच्या काही दिवसांपासून जे सुरु आहे ते आता थांबायला हवं. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केलेला नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांना कमी लेखण्याचे काम केलंय. अजित पवारांनी तसं काहीही केलेलं नाही, असं भुजबळ म्हणालेत.
छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचं रक्षण केलं, म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं जातं. पण कुणाला धर्मवीर म्हणायचं असेल, तर म्हणू शकतातस असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांवर पांघरूण घालण्यासाठी हा वाद सुरू आहे. जर अजित पवार यांचं विधान चुकीचं असतं. तर विधानसभेत त्याचवेळी त्यांना सांगायला हवं होतं की, तुम्ही बोलताय हे चुकीचं आहे, असंही ते म्हणालेत.
अजित पवार यांनी अधिवेशन काळात विधिमंडळात बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नये तर त्यांना स्वराज्य रक्षक म्हणावं, असं म्हटलं. त्यावरून लाद निर्माण झाला आहे.
अजितदादा बोलले त्यावेळी एका वर्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. मग शिवाजी महाराज आमचे नाहीत का ? ते फक्त त्यांचेच आहेत का ? आजच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी बाजूला सारून बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर विचार करायला हवा, असं भुजबळांनी यावेळी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास खूप मोठा आहे. एक-एक, दोन-दोन पानांमध्ये मुलांना इतिहास समजतो का ? चौथी पासून सातवी पर्यंत एक-एक धडा अभ्यासक्रमात टाकायला हवा. पण काहीवेळा इतिहास गाळला जातो. या विषयावर इतिहासकार, लेखक यांनी नेमकं मार्गदर्शन करावं. ही सर्वच आपली दैवतं आहेत. कुणी धर्मवीर म्हणा, कुणी स्वराज्य रक्षक म्हणा, असं भुजबळ यांनी म्हटलं.