राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का?, छगन भुजबळ यांचं एका वाक्यात उत्तर काय?; फडणवीस यांच्या भेटीनंतर भुजबळ आक्रमक?
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहे. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. आता यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Chhagan Bhujbal Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहे. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. आता यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीनंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांना पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यामागचे कारण विचारले. यावर छगन भुजबळांनी सविस्तर भाष्य केले.
फडणवीसांच्या भेटींनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर बोललो. काय काय घडलं, काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, हे आपण मान्यच करायला हवं, की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होणार नाही. याची काळजी मलाही खूप आहे.
ओबीसींचं नुकसान फडणवीस होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरू आहे. आठ दहा दिवसाने आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू, असं फडणवीस म्हणाले. तसेच मला विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असं फडणवीस म्हणाले, असे छगन भुजबळांनी म्हटले.
भाजपात जाणार का? छगन भुजबळ म्हणाले…
यानंतर छगन भुजबळांना तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार का, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एक वाक्यात उत्तर दिले. “मला जे काही बोलायचं ते सर्व बोललो आहे. मी यावर अधिक काही बोलणार नाही”, असे छगन भुजबळांनी स्पष्ट केले.