देवी सरस्वतीवरुन छगन भुजबळांचं वादग्रस्त वक्तव्य; ब्राम्हण महासंघाचा आक्षेप
शाळेत सरस्वती देवीची पूजा का करायची? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ(Chhagan Bhujbal ) यांनी देवी सरस्वतीवरुन(Saraswati) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही मग शाळेत सरस्वतीची पूजा का करायची? असा सवालच छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळ यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.
सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पार पडला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना भुजबळ यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
शाळेत सरस्वती देवीची पूजा का करायची? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही असंही भुजबळ म्हणाले.
देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं भुजबळ म्हणाले. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणीही भुजबळांनी केली.
आनंद दवे यांनी भुजबळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. देवी सरस्वतीवरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत छगनजी भुजबळ यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी दवे यांनी केली आहे.
फुले दामपात्यांचे फोटो शाळेत असायलाच हवे, बाबासाहेबांचे पण असावेत. पण सरस्वती माता, शारदा माते ला छगनजी यांना आक्षेप का ? असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे.
सरस्वती, शारदा यांना कोणीच पाहिले नाही. उद्या गणपती चे फोटो पण नाकारणार का? हिंदू दैवतांचाच यांना राग का आहे असा सवालही दवे यांनी उपस्थित केला आहे.