छत्रपती संभाजीनगर, दि. 31 डिसेंबर 2023 | छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमध्ये शाईन इंटरप्राईजेस कंपनीला भीषण आग लागली. रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंपनीत दहा ते पंधरा कामगार होते. सर्व कामगार गाढ झोपेत होते. यावेळी ही आग लागली. हे सर्व कामगार बिहारमधील आहेत. कामानिमित्त ते आले होते. या कंपनीत हॅन्ड्लोज आणि जॅकेट बनवले जात होते. त्यामुळे कंपनीत कॉटनचे कापड मोठ्या प्रमाणात होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पहाटे चार वाजता काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. जखमी झालेल्या कामगारांना घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.
आग लागल्याचे कळताच कामगारांच्या नातेवाईकांनी कामगारांना वाचवण्यासाठी आरडाओरड सुरु केली. कंपनीसमोर मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या त्वरित दाखल झाल्या. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी एकीकडे आग विझवण्याचे काम सुरु केले आणि दुसरीकडे कंपनीत असलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरु केली. आगीत मृत्यू झालेल्या सहा कामगारांपैकी चार जणांची ओळख पटली आहे. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इकबाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी त्यांची नावे आहेत.
रात्री आग लागली तेव्हा कंपनी बंद होती. कंपनीत कामगार झोपले होते. आग लागली तेव्हा कंपनीत दहा ते पंधरा जण असल्याची माहिती कामगारांनी दिली. आग लागल्याचे समजल्यावर काही जण बाहेर निघण्यात यशस्वी ठरले. परंतु काही जणांना बाहेर निघता आले नाही. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही आग कशामुळे लागली, यासंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे.
पुणे येथील पिंपरी चिंचवडमध्ये फटाके बनवणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना तीन आठवड्यांपूर्वी घडली होती. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. केकवरील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याला ही आग लागली होती. त्यानंतर राज्यात ही दुसरी घटना घडली आहे.