शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, आज मालवण बंद; केंद्रीय नेतृत्वाच्या भाजप नेत्यांना कडक शब्दात सूचना
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvan Collapsed : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाणार आहे. या घटनेचा निषेध नोंदवला जाणार आहे. वाचा सविस्तर...
सिंधुदुर्ग जिल्ह्याातील मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला. त्यावरून आता महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं आहे. आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. मालवणवासीयांकडून निषेध केला जाणार आहे. पुतळा कोसळण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. आज मातोश्रीवर महाविकास आघाडीची तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील गंभीर घडामोडींवर चर्चा होणार आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याबाबतही चर्चा होणार आहे. महाराष्ट्रभरात मविआकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
मालवणमध्ये मविआचं आंदोलन
शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाणार आहे. मालवणमध्ये जात महाविकास आघाडी निषेध आंदोलन करणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील माझी खासदार विनायक राऊत आज राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत. कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. पाहणी केल्यानंतर या घटनेचा निषेध गोंधळासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. मालवणातील भरड नाका ते मालवण पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढला जाणार आहे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अभेद्य गडकिल्ले बांधले. त्यांचा पुतळा वाऱ्याने पडतो कसा? एवढ्या निकृष्ट दर्जाच्या सामग्रीपासून हा पुतळा बांधला होता? शिवरायांच्या पुतळ्याबाबत एवढा हलगर्जीपणा का केला गेला? असा सवाल आता विरोधक आणि शिवप्रेमी विचारत आहेत.
केंद्रीय नेतृत्वाच्या भाजप नेत्यांना सूचना
राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवं, अशा सूचना केल्या गेल्याची माहिती आहे. तर पुतळ्याची योग्य देखभाल घ्यायला हवी होती. विरोधकांकडून राजकीय मुद्दा बनवला जात असेल तर सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा, असंही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुनवल्याची माहिती आहे.