… तर मंत्रालयात घुसून मंत्र्यांचे कपडे काढणार, छावा संघटनेच्या जावळेंचा ठाकरे सरकारला इशारा
मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी न लागल्यास मंत्रालयात घुसून मंत्र्यांचे कपडे फाडण्याचाही इशारा छावा संघटनेने दिलाय.
लातूर : मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधूनच आरक्षण द्यावं, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने केली आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची आज (7 फेब्रुवारी) राज्यव्यापी बैठक लातूरमध्ये पार पडली. या बैठकीत ही मागणी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी न लागल्यास मंत्रालयात घुसून मंत्र्यांचे कपडे फाडण्याचाही इशारा दिलाय (Chhava Nanasaheb Jawale warn Thackeray Government over Maratha Reservation).
नानासाहेब जावळे म्हणाले, “आज अखिल भारतीय छावा संघटनेची बैठक लातूरमध्ये बोलावण्यात आली. या बैठकीत मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी दिशा ठरवण्यात आली. ही आजची भूमिका नाही, तर अण्णासाहेब जावळे यांनी 25 वर्षापूर्वीच ही भूमिका मांडली होती. यानुसार ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं. यापुढे देखील टीकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे.”
“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छावा संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र लढा उभारणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर सुनावणी होती, मात्र ती तारीखही लांबली आहे. 8 ते 18 मार्च या काळात सुनावणी होणार आहे. 18 मार्चला सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणावर आपला निर्णय देईल. तोपर्यंत आमचं शांततेत आंदोलन असेल. परंतु त्यात हा प्रश्न सुटला नाही तर त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे मंत्री असो, आमदार असो किंवा केंद्राचे मंत्री किंवा खासदार असो सर्वांना इशारा आहे की त्यांनी जर मराठा आरक्षणाची व्यवस्थित बाजू मांडली नाही, तर या लोकांना त्या त्या जिल्ह्यात नागवं करुन मराठा समाज चाबकाचे फटके ओढल्याशिवाय राहणार नाही,” असंही जावळे यांनी नमूद केलं.
“… तर मंत्रालयात घुसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अशोक चव्हाण आणि मंत्र्यांचे कपडे काढू”
नानासाहेब जावळे म्हणाले, “यापुढील काळात महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी गनिमी काव्याने आंदोलनं होतील. या प्रश्नावर महाराष्ट्रात जो उद्रेक घडेल त्याला हे सरकार जबाबदार असेल. मराठा आरक्षणाला सरकार आतून विरोध करत असेल तर आम्ही मंत्रालयात घुसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांचे कपडे काढल्याशिवाय राहणार नाही.”
हेही वाचा :
सत्तेत असलेला मराठा समाज गरीब मराठ्यांची पोरगी करत नाही : प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणासाठी संवैधानिक तरतूद करा; अशोक चव्हाण यांची केंद्राकडे मागणी
शेतकऱ्यांप्रमाणे हिंसक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?; विनायक मेटेंचा संतप्त सवाल
व्हिडीओ पाहा :
Chhava Nanasaheb Jawale warn Thackeray Government over Maratha Reservation