चिकन खाणाऱ्यांनो सावधान राहा, बर्ड फ्लूबाबत महत्वाची सूचना
उपराजधानी नागपूरातील अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयित कोंबड्यांना आणि अंड्यांना नष्ट करण्यात आले आहे. नागपूरातील या केंद्रा शिवाय इतरत्र कोठेही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे आढळून आलेले नाही. तरीही कोंबड्याचं मांस खाताना काळजी घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
नागपूर | 8 मार्च 2024 : नागपूरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लू रोग झाल्याचे निष्पन्न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 2 मार्च रोजी या केंद्रात सर्वाधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या रोगाचा प्रादूर्भाव आणि प्रसार टाळण्यासाठी नागपूरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राच्या एक किलोमीटर त्रिज्येतील सर्व कुक्कुट पक्षांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले आहे. प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र वगळून राज्यात इतरत्र कोठेही कोंबड्यांना प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आलेले नाही तरीही नागपूर वगळता इतर क्षेत्रातील व्यक्तींनी कोंबडीचे मांस आणि अंडी नीट शिजवून खावीत असे आवाहन आरोग्य विभाग उपसंचालिका डॉ.कांचन वानेरे यांनी केले आहे. अंडी उबवणी केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या घशातील स्रावाचे नमून देखील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
राज्याची उपराजधानी नागपूरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या कोंबड्यांचे नमूने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी तपासणीत अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू एव्हियन इन्फ्ल्युएन्झा ( बर्ड फ्लू ) मुळे झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे या केंद्रातील साडे आठ हजार कोंबड्यांना मारुन त्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय काळजी घ्यावी
प्राण्यांमधील संक्रमण आणि रोगप्रतिबंध तसेच नियंत्रण अधिनियम 2009 आणि बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखडा या नियमानूसार नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रापासून 1 किलोमीटरचा परिसर बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत केला होता. तर केंद्रापासूनचा 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत केले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी म्हटले आहे. राज्यातील इतर भागातील कोंबड्यांना या आजाराची बाधा झालेली नसल्याने इतर क्षेत्रातील कोंबडीचे मास आणि अंडी योग्यरित्या शिजवून सेवन करण्यास हरकत नाही असे डॉ.कांचन वानेरे यांनी म्हटले आहे. अंडी-चिकन खावे किंवा कसे याबाबत वेगवेगळ्या शंका आणि अफवा पसरविल्या जात आहेत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. आजारी कोंबड्यांचे नीट शिजवलेले नसल्यास माणसांना देखील बर्ड फ्लू होऊ शकतो. ज्या ठिकाणी एव्हीयन इनफ्ल्यूएंजा सारखा आजार आढळतो अशा रुग्णांना आयसोलेटेड करुन त्यांच्या घशातील सॅम्पल्स तपासणीसाठी घेणार आहे.