‘मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादाही तितकेच दोषी’, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ‘या’ नेत्याने सरकारला फटकारलं
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पाठपुरावा केला नाही. पण, तेव्हा ते त्या समितीचे तुम्ही घटक होतात. आत्ताच्या सरकारमधले १८ मंत्री त्यावेळेस आमच्यासोबत होते. मग, मराठा आरक्षण घालवण्यात यांचाही वाटा आहे का?
नागपूर : 3 सप्टेंबर 2023 | जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जारंगे पाटील यांची भेट घेत आहेत. यावरून राजकारण सुरु झाले आहे. राज्यात २०१२ – १३ पासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरु झाला. त्यावेळी नारायण राणे समितीने सर्वे केला. २०१४ ला भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हायजॅक केला. त्यांनी घाईघाईने निणर्य घेतला. पण भाजप सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. आताचे शिंदे सरकार त्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहे. पण, त्यावेळी तुम्हीही आमच्यासोबत होतात असा पलटवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
२०१४ ला भाजप नेत्यांनी घोषणा सत्तेत आलो की १०० दिवसांत आरक्षण देऊ अशी घोषण केली. पण ते झालं नाही. त्यांनी घाई घाईने गायकवाड समिती स्थापन केली. गायकवाड समितीने आरक्षण दिलं. भाजपने त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते आरक्षण हायकोर्टात कसंबसं टिकलं. पण, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकू शकले नाही, असे त्यांनी सांगितले.
आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची आवश्यकता आहे. आर्थिक मागास वर्गाला जसं आरक्षण दिलं. तसेच ओबीसींमध्ये १२ ते १३ टक्के आरक्षण वाढवून मराठा समाजाला आरक्षण देता आले असते. पण, यांना राजकारण करायचं आहे. आमच्यावर आरक्षण घालवण्याचा आरोप होत असले तर आताचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही तितकेच दोषी आहेत अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.
शासन आपल्या दारी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या घरी
बुलढाणा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गैरहजेरी होती. शासन आपल्या दारी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या घरी अशी वेळ सरकारवर आली आहे अशा शब्दात त्यांनी सरकारची खिल्ली उडविली. दोन्ही उपमुख्यमंत्री येणार नव्हते तर मग आजचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलायला हवा होता. दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस कार्यक्रम टाळणार असा सवालही त्यांनी केला.
कलुषित झालेली मनं जोडण्याचं काम राहूल गांधी यांनी केलं
राहूल गांधी यांनी ४ हजार किलोमीटरचा प्रवास करुन लोकांना जोडण्याचे काम केले. कलुषित झालेली मनं जोडण्याचे काम त्यांनी केले. राज्याच गेल्या काही दिवसांत सात दंगली झाल्या, या दंगलीला जबाबदार कोण? याचं उत्तर येत्या काळात कळेल. माणसांना जोडण्याचं काम जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही करतोय. याद्वारे लोकांच्या वेदना, दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या ९ वर्षांमध्ये कोणता घटक सुखी आहे, जनतेला काय मिळालं याचे उत्तरही या यात्रेतून देणार आहोत असे त्यांनी सांगितले.