वाढदिवसाआधीच मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना मोठे गिफ्ट, नेमकं काय घडलं?
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या शिकवणीच्या आधारावर राज्याचे नेतृत्व करत आहोत. गेल्या दोन वर्षात ग्रामीण तसेच शहरी विकासासाठी महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शनिवारी 27 जुलैला वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित राज्यभरातील शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाचे एक गिफ्ट दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच ठाण्यात पक्षाला खिंडार पाडले. ठाण्यातील युवासेनेच्या अनेक पदाधिऱ्यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नंदनवन निवासस्थानी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश दिला.
शिवसेनेत ( शिंदे गट) प्रवेश करण्यापूर्वी युवासेना पदाधिकारी यांनी आदित्य ठाकरे यांना एका पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी ”गेली 15 वर्ष सातत्याने युवासेनेच्या स्थापनेपासून युवकांचे संघटन ठाण्यात मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने आम्ही दिवसरात्र काम करत होतो. प्रसंगी विरोधकांना अंगावर घेतले. परंतु, गेल्या 2 वर्षात काही निवडक पदाधिकारी यांनी चालू केलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आमच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे आम्ही जडअंतकरणाने सामुहिकरित्या पदांचा राजीनामा देत आहे.” असे म्हटले आहे.
ठाणे शहर उबाठा युवा सेनेचे शहर अधिकारी किरण जाधव, उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, बाळकूम शाखा प्रमुख अभिषेक शिंदे, शहर उपसमन्वयक दीपक कनोजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह अनेक युवासेना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘गेल्या दोन वर्षात सरकारने कल्याणकारी योजना आणि विकासात्मक दृष्टीमुळे जनतेचा महायुती सरकारवर विश्वास वाढला आहे. उबाठाच्या कार्यकाळात विकासाला लावलेले स्पीड ब्रेकर काढून राज्य प्रगतीच्या मार्गावर आणले.’ अशी टीका केली.
शिवसेनेत कार्यकर्त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक, यामुळे इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत ओघ सुरूच आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या शिकवणीच्या आधारावर राज्याचे नेतृत्व करत आहोत. गेल्या दोन वर्षात ग्रामीण तसेच शहरी विकासासाठी महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचे कल्याण करणाऱ्या योजना सरकार यशस्वीरीत्या राबवत असल्याने राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेत वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.