ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? प्रकाश आंबेडकर यांच्यासह जुन्या पेन्शनबद्दल शिंदे यांची प्रतिक्रिया काय?
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देत उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई : आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध ठिकाणी आज राष्ट्रध्वज फडकविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवत महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर भाष्य केले आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्यासह शरद पवार यांच्यावर बोलणं टाळत ते मोठे नेते असून त्यांच्याबद्दल काय बोलणार असं म्हंटलं आहे. इतकंच काय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येईल असं म्हंटलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तरांच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या सर्व साडेबारा कोटी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मनापासून विनम्र अभिवादन करतो.
महाराष्ट्र सरकार राज्याच्या विकासाचे अनेक कामे करत आहे, यासोबतच पायाभूत विकासासाठी देखील प्रयत्नशील आहे असं शिंदे म्हणाले.
याशिवाय राज्यातील बहुतांश ठिकाणी पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रध्वज फडकविला आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल असं विचारण्यात आले होते त्यावर शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येईल असं म्हंटलं आहे.
याशिवाय उद्धव ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळें ते जात असतील तर हरकत नाही असं शिंदे म्हणाले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर देखील आमचे स्नेही आहे त्यामुळे त्यांच्या बाबत मी काय बोलणार.
जुन्या पेन्शन बाबत शिक्षण विभाग काम करत आहे त्याचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल सरकार याबाबत सकारात्मक आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.