एकनाथ शिंदे काम करू शकतात का?; डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Dec 03, 2024 | 3:48 PM

एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांचे चेकअप झाल्यानंतर ते बाहेर पडले. यानंतर डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती कशी आहे आणि ते काम करु शकतात का? याबद्दल प्रसारमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे काम करू शकतात का?; डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया काय?
Follow us on

Eknath Shinde Health Update : महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच सध्या महायुतीचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. त्यातच आता नुकतंच एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

एकनाथ शिंदे काही दिवसांपासून आजारी

एकनाथ शिंदे यांचे ज्युपिटर रुग्णालयात चेकअप केल्यानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते रस्ते मार्गाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. त्यांच्या पांढऱ्या पेशीही वाढल्या होत्या. त्यासोबतच घशाला संसर्गही झाला होता. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे आजारपणामुळे साताऱ्यातील दरेगावात मुक्कामी होते. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी आराम केला. भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांना सलाईन लावली होती, अशी माहिती गिरीश महाजनांनी माध्यमांना दिली होती.

ज्युपिटर रुग्णालयात चेकअपसाठी दाखल

यानंतर आज दुपारी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात चेकअपसाठी नेण्यात आले. एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांचे चेकअप झाल्यानंतर ते बाहेर पडले. यानंतर डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती कशी आहे आणि ते काम करु शकतात का? याबद्दल प्रसारमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

डॉक्टर काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. त्यासोबतच त्यांचा घशाचा संसर्ग झाला होता. त्याच्या काही चाचण्या करण्यासाठी ते रुग्णालयात आले होते. त्याचा एमआरआय, एक्स रे करण्यात आला. त्यांना थोडा अशक्तपणाही आला आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट चांगले आहेत. आम्ही रिपोर्टमध्ये काय हे सांगू शकत नाही. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. ते काम करु शकतात. आता ते कामासाठीच गेले आहेत, असे डॉक्टर म्हणाले.

दरम्यान एकनाथ शिंदे हे रुग्णालयात आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि मुलगा श्रीकांत शिंदे हे देखील होते. एकनाथ शिंदेंसोबत ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे हे ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. माजी खासदार राहुल शेवाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ज्युपिटर रुग्णालयात आले होते.