एकनाथ शिंदे यांचे आजारपण, नको ‘त्या’ चर्चा, तर मुख्यमंत्री म्हणतात, अनेक ज्योतिष…
विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेतील लोकांसाठी खालापूर येथे बांधण्यात आलेल्या तात्पुरता निवारा केंद्राच्या पाहणी केली.
रायगड : 15 ऑगस्ट 2023 । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवस आजारी होते. आजारपणामुळे त्यांनी पुण्यातील चांदणी चौक येथील उड्डाण पुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला जाण्याचेही टाळले होते. तर, याच आजारपणाच्या दिवसात ठाण्यात एका दिवशी १८ रुग्णांचे मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली. मुख्यमंत्री शिंदे यांचे सहकारी आमदार संजय शिरसाट यांनी आम्ही त्यांना जबरदस्तीने अॅडमिट करणार असल्याचे म्हटले होते. तर, शिंदे यांच्या आजारपणावरून विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जोरदार पलटवार केलाय.
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 तास काम करतात. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. आम्ही त्यांना डॉक्टरकडे जाण्याची विनंती केली आहे. त्यांनी जर ऐकले नाही तर आम्ही त्यांना 15 ऑगस्टनंतर बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार असे संजय शिरसाट म्हणाले होते.
आराम करायला मुख्यमंत्री की राज्यकारभार करायला
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यावरून शिंदे यांना खोचक सवाल केला होता. उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा त्यांच्या आजारावर टीका केली. तेच मुख्यमंत्री आजारी पडले आहेत. अराम करायला गेले आहेत. मग, तुम्ही आराम करायला मुख्यमंत्री झालात की राज्यकारभार करायला? असा टोला राऊत यांनी लगावला होता.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे भाकीत वर्तवले होते. दिल्लीतील त्यांचे हायकमांड आरोग्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याच्या प्रयत्नात आहे असे ते म्हणाले होते. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही खेळी असावी असेही ते म्हणाले होते.
सहा महिन्यात इर्शाळवाडीतील लोकांना हक्काची घरे
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेतील लोकांसाठी खालापूर येथे बांधण्यात आलेल्या तात्पुरता निवारा केंद्राच्या पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या सहा महिन्यात इर्शाळवाडीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरे देणार असल्याचे आश्वासन दिले.
इर्शाळवाडी येथील 42 कुटुंबियांच्या घराचा प्रश्न सोडवणारच. त्याचबरोबत त्यांच्या रोजगार, शिक्षण, विधवा महिला आणि 22 अनाथ मुलांचा प्रश्न मार्गी लावला आहे. मी शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असून वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला.
अनेक ज्योतिषी तयार झालेत
माझी तब्येत चांगली आहे. मी इर्शाळवाडीला व्हॅनिटी व्हॅन घेवून आलो नाही. चिखल तुडवत वर गेलो. अनेक लोकांची कामे केली आणि त्यांचेच आशीर्वाद माझ्यामागे आहे. त्यामुळे मला काही होणार नाही. सरकार स्थापन झाल्यापासून ते पडणार असल्याचे काही जण सांगत आहेत. सध्या अनेक ज्योतिषी तयार झालेत. हे सरकार चांगले आणि महत्वाचे निर्णय घेत आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला.