कारवाईची घोषणा नको, कृती करा…मुख्यमंत्री शिंदे यांनी दीपक केसरकरांना फटकारलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांना फटकारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मालवण घटनेबाबत सांभाळून वक्तव्य करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. 'शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन झालीये. कारवाईची घोषणा नको, तर कृती करा ' अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केसरकरांना दिल्या
बदलापूरमधील शाळेतील मुलींवर झालेला अत्याचार असो किंवा मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना… या सर्व घटनांमुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यातच या घटनांवरून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सरकारच्या अडचणी वाढू शकतात. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांना फटकारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मालवण घटनेबाबत सांभाळून वक्तव्य करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. ‘शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन झालीये. कारवाईची घोषणा नको, तर कृती करा ‘ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केसरकरांना दिल्या आहेत. मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्याकडून त्यांना देण्यात आले आहेत.
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण उघडकीस आलं आणि त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. मुलींच्या , महिलांच्या सुरक्षेवरून सरकारला अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत, विरोधकांनी सरकारला धारेवर धरत घेरण्याचा प्रय्तनही सुरू आहे. यावरूनच आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मुख्यमंत्री समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कृती करा, नुसती कारवाईची घोषणा नको
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात सरकारची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याचवेळी राज्यात घडणाऱ्या अशा घटनांनंतर सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असेल तर त्यासंदर्भात कृती करा, नुसती कारवाईची घोषणा नको अशी समज मुख्यमंत्र्यांनी केसरकर यांना दिल्याचे समजते.
मालवणमध्ये नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानेही राज्यात संतापाचे वातावरण असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतरही दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केलं तेही अनेकांना रुचलेलं नाहीये. ‘कुठेतरी काहीतरी चांगल घडायचं असेल म्हणून (पुतळा कोसळण्याची) ही घटना घडली असेल. आणि याच्यापेक्षा मोठा पुतळा उभारण्यात येईल ‘ असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून असंवेदनशीलता व्यक्त होत असल्याची टीका अनेकांनी केली. त्यावरूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केसरकर यांना समज देत मालवण घटनेबाबत सांभाळून वक्तव्य करण्याच्या सूचनाही त्यांना दिल्या.
सांभाळून वक्तव्य करा..
बदलापूरच्या घटनेमुळे राज्यात उमटलेले तीव्र पडसाद यावरून समज देण्यात आली. तसेच शिक्षण विभागातील काही गोष्टींमुळे जर राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असेल तर त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांना सांगण्यात आलं. तसेच सांभाळून वक्तव्य करा, अशी समजही देण्यात आली. कालही मालवणच्या प्रकरणावरून केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हाही ते भडकल्याचे पहायला मिळाले होते. याच सर्व अनुषमंगाने मुख्यमंत्र्याकडून त्यांना तीव्र शब्दांत समज देण्यात आली.