मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला, कोणी बघत नसलं तरी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे…
अयोध्येसाठी मलाही निमंत्रण होतं. आजचा सोहळा पाहतोय त्याचा आनंद सर्वजण घेतोय. एकट्याने दर्शन न करता आमचे मंत्रिमंडळ खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातील रामभक्त लाखो सामील झाले पाहिजे. आम्ही त्याची तयारी करतोय लवकरच तारीख सांगून रामलल्लाचे दर्शन घेऊ,
ठाणे | 22 जानेवारी 2024 : अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं हे सर्वांचं स्वप्न होतं. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण होतंय हा एक ऐतिहासिक क्षण आहे. सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावे असा हा दिवस. 14 वर्षाचा रामाचा वनवास संपला. पाचशे वर्षाचा हा इतिहास आहे ज्याकडे देशातील जनता आस लावून बसली होती. हा देशाचा नाही तर जगभराचा विषय आहे. हे दृश्य सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे सुरुवातीपासून अयोध्या आणि राम मंदिराचे जिवाचे नाते होतं. कार सेवा सुरू असताना आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली चांदीची वीट अर्पण केली होती. आम्ही जेव्हा तिकडे जातो तेव्हा राममय झालेलं वातावरण पाहतो. त्या ठिकाणी अनोखी शक्ती आहे. रामाचं अस्तित्व जाणवतं. राम भक्तांची इच्छा आदरणीय नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपण आजचा सोहळा पाहत आहोत. महाराष्ट्राच्या सर्व रामभक्त आणि जनतेच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या आभार मानतो, असे सांगून ते पुढे म्हणाले, अयोध्येसाठी मलाही निमंत्रण होतं. आजचा सोहळा पाहतोय त्याचा आनंद सर्वजण घेतोय. एकट्याने दर्शन न करता आमचे मंत्रिमंडळ खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातील रामभक्त लाखो सामील झाले पाहिजे. आम्ही त्याची तयारी करतोय लवकरच तारीख सांगून रामलल्लाचे दर्शन घेऊ, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
रामलल्ला वनवासला निघाले तेव्हा नाशिकला गेले त्यामुळे महाराष्ट्राचे एक वेगळंच नातं आहे. महाराष्ट्रातून मंदिरासाठी सागाचे लाकूड गेले आहे. त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहोत. महाराष्ट्राचं नातं आणि अयोध्याचं नातं घट्ट करण्यासाठी लवकरच आम्ही सर्व एकत्र दर्शनाला त्या ठिकाणी जाऊ असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
काही लोकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. बहिष्कार घालणाऱ्या लोकांना काही लोकांनी साथ दिलेली आहे त्यांना सुबुद्धी दिली पाहिजे. चांगली बुद्धी, सुबुद्धी या सर्वांना मिळावी. याचे राजकारण करतात त्यांनाही सुबुद्धी मिळावी. जनता ‘जय श्रीराम असा जयघोष करत आहे. सगळ्यांनी आनंद सोहळ्यात सामील झाले पाहिजे. मात्र, काही लोक रामाचे अस्तित्व आणि मंदिरावर यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. म्हणून मी म्हणतो की ‘जो राम का नही होता किसी काम का नही होता.’ हा सोहळा कोणी बघत नसलं तरी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे स्वर्गातून आज पाहत आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.