तळपत्या उन्हात आदिवासींचा लॉन्ग मार्च, मुख्यमंत्र्यांसोबतची आजची बैठकही रद्द, आता पुढे काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिक वरून निघालेल्या लॉंग मार्चमधील मोर्चेकऱ्यांसोबत आज बैठक आयोजित करण्यात आलेली होती. मात्र, ही बैठक कोणत्या कारणाने रद्द झाली यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक : विविध मागण्यांसाठी नाशिकच्या दिंडोरी येथील आदिवासी शेतकरी हे मुंबईच्या दिशेने लॉन्ग मार्च काढत आहेत. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्यासोबत आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज बैठक पार पडणार होती, मात्र ती बैठक रद्द करण्यात आलेली आहे. लॉंग मार्च चा आजचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी दिंडोरीतून निघालेला लॉंग मार्च नाशिक पासून आठ किलोमीटर अंतरावर म्हसरूळ परिसरात मुक्कामी होता. त्यानंतर हा लॉंग मार्च दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला सुरू झाला आणि तो सायंकाळच्या वेळेपर्यंत अंबेबहुला या परिसरापर्यंत जाऊन पोहोचला.
त्यानंतर पुन्हा आज लॉन्ग मार्चला सुरुवात झाली आणि अंबेबहुला येथून हा लॉन्ग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. मुंबईच्या दिशेने निघालेलं हे लाल वादळ सरकारच्या अडचणी वाढवणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध समस्या यांना न सोडवल्याने शेतकरी संतप्त झालेले आहे, आता कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही म्हणत शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करताय. तळपत्या उन्हात देखील शेतकरी कसलीच तमा बाळगत नाहीये.
आपल्या मागण्या मान्य करूनच घ्यायच्या अशी भूमिका घेत आहेत अगदी अनवाणी पायाने देखील काही शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. शेतकरी नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत.
जवळपास 17 मागण्या या शेतकरी आंदोलकांनी सरकार दरबारी मांडल्या आहेत, मात्र त्याच्यावर अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही न झाल्याने या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लॉन्ग मार्चही हाक दिली होती. नुकत्याच झालेल्या दिंडोरी येथील बैठकीमध्ये हा लॉन्ग मार्च पुन्हा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नाशिक वरून निघालेल्या मोर्चेकऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नियोजित बैठक होती. तीन वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री आणि आंदोलकांच्या मध्ये ही बैठक पार पडणार होती. त्यामुळे संपूर्ण बैठकीकडे आदिवासी बांधवांचे लक्ष लागून होतं.
मात्र अचानक ही बैठक रद्द करण्यात आल्याचा निरोप आंदोलकांच्या शिष्टमंडळाला आलेला आहे. दरम्यान ही बैठक का रद्द झाली याबाबत कुठलंही कारण सांगितलं गेलं नसलं तरी सरकारच्या आधीच अडचणीत भर घालणारा जुना पेन्शनचा मुद्दा आजच्या दिवशी चर्चेचा विषय ठरणार आहे.
याशिवाय आज सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे ही बैठक रद्द झाल्याची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने होऊ लागलेली आहे. एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक उद्या होणार असल्याची माहिती मिळत आहे.