LadKi Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, हप्त्याबाबत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लाडकी बहीण योजना हा सध्या निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरत असून, विरोधकांनी केलेल्या घोषणेनंतर आता एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी लाडक्या बहिण योजेनेवरून विरोधकांवर हल्लाबोल केला. मी जी कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो. सत्तेतून आम्ही बाहेर पडलो, ज्या ठाकरे गटाने धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो आम्ही सोडवून आणला. राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा आम्ही केलेली कामं तुमच्यासमोर आहेत, यांनी कामात खोडा घातला असं म्हणत यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून देखील त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला, ते लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात पळाले, पण कोर्टानं त्यांच्या थोबाडीत मारली. लाडक्या बहीणीचं दुःख त्यांना काय माहिती, ते म्हणतात आमचं सरकार आलं की सर्व योजनांची चौकशी लावू. या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जायला तयार आहे.
आम्हाला माहीत होतं आचारसहिता लागली की काळ मांजर आडवा घालणार. म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचा हप्ता देऊन टाकला. लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता भरणारं आमचं सरकार आहे. मात्र, पूर्वीच सरकार हप्ते घेणारं होतं. लाडक्या बहिनींना लखपती झालेलं बघायचा आहे, हेच आमचं आता स्वप्न आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, आता राहुल गांधी आले आणि म्हणतात 3000 देणार.. राजस्थान, हिमाचल आणि कर्नाटकमध्ये तुम्ही जनेताला फसवलं. तुम्ही देणार म्हणता, आणि आम्ही देऊ लागलो. लाडक्या बहिणींना बघून, ते येडे झाले त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचा आहे, हेच आमचं आता स्वप्न आहे. 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.