‘यांचे काय होणार माहित नाही’, सचिन अहिर यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात स्किल इंडिया आणि मेकिंग इंडिया चर्चा होत आहे. पण, ज्या संस्था नीट चालत आहेत त्यांना नियमित प्रशासन देण्याचं काम केलं असतं तर आजचा दिवस आला नसता. पगारासाठी नाही तर अस्तित्वासाठी लढायला पाहिजे.
मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | महानंद या संस्थेला कर्मचाऱ्यांनी जगाच्या आणि भारताच्या नकाशावर आणलं. संस्थेला मोठं करण्याचं काम केलं आहे. इथे काम करणारे सर्वच जण मुंबईत जन्माला आलेले नाहीत, अनेकजण गावावरून इकडे आले आहेत. लग्न जुळवताना छाती पुढे करून सांगायचे की कुठं कामाला तर महानंदमध्ये आहे. पण, आता परिस्थिती वेगळी आहे. जाणूनबुजून या संस्थेला कमकुवत करण्याचे काम झाले. विधान परिषदेत आवाज उठवला. त्यावेळी मंत्री महोदयांनी उत्तरं दिले. पुन्हा त्यना भेटलो. तेव्हा ते म्हणाले, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलावे लागेल. यांचे काय होईल हे माहिती नाही, अशा शब्दात आमदार सचिन अहिर यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
महानंद ही राज्यातली संस्था पण कदाचित ती भारतात मोठी झाली असती. तिला पहिल्या क्रमांकावर आणता आलं असतं. मात्र, काही पुढाऱ्यांनी सोयीनुसार राजकारण केलं. आपलं वर्चस्व राहावं यासाठी संचालक केलं. त्यामुळे संस्था मोठ्या न होता ते मोठे झाले अशी टीकाही त्यांनी केली.
जाणूनबुजून या संस्थेला कमकुवत करण्याचं काम झाले. याच पद्धतीने वरळी डेअरीही बंद होण्याच्या मार्गांवर आहे. यंत्र सामुग्री व्यवस्थित नसल्याने ही परिस्थिती आहे, अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आता जागे राहीले पाहिजे. काहीही झाले तरी खाजगी लोकांच्या हातात ही संस्था देऊन चालणार नाही, असे ते म्हणाले.
महानंदसाठी विधान परिषदेत आवाज उठवला. त्यावेळी मंत्री महोदयांनी उत्तरं दिले. मंत्री महोदयांना भेटायला गेलं तर मंत्रालयात मंत्री नाहीत. आताच गेलेत, कुठे गेले के कुणालाच माहिती नाही. एकदा मंत्र्यांची भेट झाली. तेव्हा त्यांना ‘साहेब साईबाबांचं दर्शन झालं पण तुमचं दर्शन होत नाही’, असे खाजगीत बोललो. ‘तुम्ही काय तातडीने कारवाई करणार आहात का? जे आश्वासन दिल ते ही पूर्ण केलं नाही. तुम्ही दिलेलं आश्वासनाचे काय करणार आहात असा सवाल केला.’
‘मी आमदार आहे केव्हाही मंत्र्याच्या केबिनला येऊ शकतो. पण कर्मचाऱ्यांना मंत्री भेट देत नाही. त्यावेळी मंत्री म्हणाले, ‘मुख्यमंत्री यांच्याशी बोलायला लागेल. त्यानंतर म्हणाले, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशीही बोलावे लागेल. पुढच्या अधिवेशनात यावर काय होईल हे माहित नाही, असा टोला आमदार अहिर यांनी लगावला.
एका वार्डच्या एका नगरसेवकाला 18 कोटी रुपये दिले जातात. मग या कामगारांना पैसे का दिले जात नाहीत? गतिमान सरकार आहे तर हे पैसे देणे यांच्यासाठी काहीच नाही. या विभागाकडे मागणी करायला गेलं की यांचे सचिवही टिकत नाहीत. आता मुंढे साहेब आले आहेत. आपली लढाई सचिवांसोबत नाही, एका व्यक्ती सोबत नाही तर त्यांनी केलेली घोषणा यावरून आहे, असे ते म्हणाले.
नविन राजकीय बदल झाले. आता काहीजण आपले लोक येण्यासाठी आपलेच संचालक देण्याचा प्रयत्न करतील. सरकारला निवेदन दिलं आहे, हा लढा संघटनेपुरता नाही. उद्योग टिकला तर संघटना राहील. पगार देणे ही कुणावर मेहरबानी नाही. वेळेत पगार झाला नाही तर जे असतील तर त्यांना घेराव घालण्यात येईल. कंपनी सुरु असताना पगार देणे हे त्यांचे काम आहे. आज एक दिवस आंदोलन करतोय पण, वेळ आली तर तुमच्या घरासमोर देखील आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.