Chiplun Flood : चिपळूणच्या तिवरे गावाला मुसळधार पावसाचा तडाखा, 6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी धास्तावले!

| Updated on: Jul 26, 2021 | 10:45 PM

चिपळूण तालुक्यातील तिवरे गावाला मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसतोय. त्यातच गावातील 6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी धास्तावले आहेत. डोंगराच्या वरील भागास मोठ्या भेगा गेल्यानं फणसवाडीसह गावातील अन्य 100 घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

Chiplun Flood : चिपळूणच्या तिवरे गावाला मुसळधार पावसाचा तडाखा, 6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी धास्तावले!
चिपळूणच्या तिवरे गावात भूस्खलन
Follow us on

चिपळूण : मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे चिपळूणमध्ये हाहा:कार माजला. तर पोसरे-बौद्धवाडी गावात दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी आता पुन्हा एकदा चिपळूण तालुक्यात भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. तालुक्यातील तिवरे गावाला मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसतोय. त्यातच गावातील 6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी धास्तावले आहेत. डोंगराच्या वरील भागास मोठ्या भेगा गेल्यानं फणसवाडीसह गावातील अन्य 100 घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तर पुराच्या पाण्यात भेंद वाडीतील पूलही वाहून गेलाय. त्यामुळे पलीकडच्या वाडीचा संपर्क तुटला आहे. (Landslide in Tiware village in Chiplun taluka)

डोंगराच्या वरच्या भागाला भेगा पडल्यामुळे आणि संभाव्य धोका लक्षात घेत गावकऱ्यांचं तात्त्पुरत्या स्वरुपात समाज मंदिरात स्थलांतर करण्यात आलं आहे. मात्र, तिथेही पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन ग्रामस्थ पुन्हा आपल्या घरात राहत असल्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. तिवरे गावात जाणारे अनेक पुल वाहून गेल्यामुळे गावात जाण्यासाठी प्रशासनालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तळीयेतील बचावकार्य थांबवलं

गेल्या पाच दिवसांपासून तळीये येथे दरडीचा ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती. आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली. तसेच आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, त्याशिवया आम्हाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.

अजूनही 32 नागरिक बेपत्ता

पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत. डोंगराच्या दरडीबरोबर दोन ते चार किलोमीटरपर्यंत हे नागरिक घरंगळत गेले असावेत असं सांगितलं जातं. त्यामुळे या संपूर्ण दोनचार किलोमीटरच्या परिसरातही शोधाशोध करण्यात आली. यावेळी पाऊस जास्त असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येत होता. तसेच सर्वत्र चिखल झाल्याने त्यातून मार्ग काढत जाणंही कठिण होत होतं.

संबंधित बातम्या : 

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती करा, आरोग्य सुविधाही उपलब्ध करुन द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

केवळ डोकं बाहेर, सगळं अंग चिखलात रुतून, 24 तास धडपड, दरडीला गाढणाऱ्या आजीचा थरार

Landslide in Tiware village in Chiplun taluka