“तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते…” भाजप नेत्या चित्रा वाघ कुणावर भडकल्या?
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिशा सालियन प्रकरण आणि संजय राठोड यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या जाणाऱ्या क्लीनचीटवरून तीव्र टीका केली आहे. वाघ यांनी ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत आणि या प्रकरणातील न्याय मिळवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सध्या राज्यात सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियन प्रकरणावरुन घमासान सुरु आहे. यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना क्लीनचीट दिली आहे. ती माझ्या जातीची नाही, तरीही मी कायम लढत राहिले, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
“दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे. त्याच्यावर संजय राठोड यांचा विषय घेण्यात आला. मी जे करायचं होतं ते केलं. मला जे दिसलं जे पुरावे आले, त्यावर मी लढले. तुम्ही तोंड शिवून बसला होता. मला विचारता ते कसे मंत्रिमंडळात आले, असं मला विचारता”, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
“अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी त्यांना क्लीनचीट दिली. अनिल परब हुशार आहे, ते फार मोठे विधीज्ञ आहेत. आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहेत. ते का मंत्रिमंडळात आहे, त्याचं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिले. मग तुम्ही उत्तर दिलं नाही. सोयीप्रमाणे आपलं तोंड गप्प करायचं आणि महिलांवर दादागिरी करायची. तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीनचीट दिली”, असा रोखठोक प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला.
“चित्रा वाघ तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते”
“संजय राठोडला उध्दव ठाकरेंनी क्लीनचीट दिली. अनिल परब यांनी उध्दव ठाकरेंना विचारावं. चित्रा वाघ तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. मी काय वशिल्याने आले नाही. उध्दव ठाकरेंनी क्लीनचीट दिली. जाता जाता बोलले हीच्या नवऱ्याला पकडलं. अनिल परबांनी सांगितलं की संजय राठोडांनी कसा लढा दिला. तुमच्या नेत्यांना मी विचारणार की संजय राठोडला कशी क्लिनचीट दिली”, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.
“आम्हाला हलक्यात घेऊ नका”
“ती माझ्या जातीची लागत नाही, तरीही मी कायम लढत राहिले. माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं, यांच्या सरदाराने क्लीनचीट दिली. काहीच राहत नाही तेव्हा माझ्या नवऱ्यावर आले, काही राहत नाही तेव्हा माझ्यावर आले. आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्ही जर बोलायला लागतो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील. आम्ही फक्त लढलो, एसआईटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हटलो तर यांचे हे हाल झाले. आम्ही काय जास्त महिला नाही, तिघी चौघी नाही, आमच्या घरावर का येताय?” असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.