उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्या भेटीत खडाजंगी, भेटीत ठाकरेंना साळवी यांनी नेमकं काय सांगितलं ?
कोकणातील लाजीरवाण्या पराभवावरून मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्या खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि कोकणातील पराभवावर पाऊण तास चर्चा केल्याची माहिती आहे. राजन साळवी यांच्यासोबत याप्रसंगी तालुका प्रमुख, मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख उपस्थित होते.
राज्यातील विधानसभा निवडणूकांत झालेल्या अपमानजनक पराभवातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना काही सावरायचं नावच घेत नसल्याचे उघडकीस आले. महायुतीने विधानसभेत २३२ जागांचे राक्षसी बहुमत मिळविले आहे. या निवडणूकांत देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाला सर्वाधिक १३५ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागा मिळवून दुसरा क्रमांक गाठला आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने आश्चर्यकारक ४१ जागा पटकावल्या आहेत. मात्र लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला पन्नाशी देखील गाठता आलेली नाही. त्यात उद्धव ठाकरे यांना अवघ्या २० जागांवर समाधान मानावे लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून कोकणातील नेते राजन साळवी भाजपात जाणार असल्याच्या चर्चांमुळे शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडणार असल्याचे म्हटले जात आहे. या दरम्यान, राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत उभयनेत्यांत जोरदार खडाजंगी झाल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या चौकशीमुळे त्रस्त असलेले आणि कोकणातील पराभवानंतर ठाकरेंवर नाराज असलेल्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही भेट तब्बल पाऊण तास चालली असून त्यात उभय नेत्यांत मोठी खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. कोकणातील पराभवाला शिवसेनेचे नेते विनायक राऊत जबाबदार असल्याचे राजन साळवी यांनी ठाकरे यांना सांगितले. त्यानंतर कोकणातील पराभव ही सामुहिक जबाबदारी असून तुम्ही देखील कोकणातील पराभवाला जबाबदार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी राजन साळवींना सुनावले. त्यावेळी आपल्या मतदार संघात तर विनायक राऊत यांना २१ हजाराचा लीड मी मिळवून दिला असल्याने मी या पराभवाला कसा जबाबादार असे उत्तर राजन साळवी यांनी ठाकरे यांना दिले.
राजन साळवी यांनी शिवसेना नेते विनायक राऊत हेच कोकणातील पराभवाला जबाबदार आहेत आणि विनायक राऊत यांचा मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना निवडून देण्यात मोठे योगदान असल्याचा आरोपही साळवी यांनी केला आहे. त्यावर उद्धव ठाकरे प्रचंड संतापले असून त्यांना विनायक राऊत यांना पक्षातून काढून टाकू की जिल्हा प्रमुखांना पक्षातून काढू? आणखी कोणाकोणाला पक्षातून काढू असा संतप्त सवाल ठाकरे यांनी केल्याचे समजते. त्यावर आपण हा सर्वस्वी तुमचा निर्णय असून मी काय सांगणार असे राजन साळवी यांनी ठाकरे यांना उत्तर दिल्याचे सांगण्यात येते.
भेटीत नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना तुमच्या म्हणण्यानुसार आता काय करायचं? विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू ? असा संतप्त सवाल केला. त्यावर राजन साळवी यांनी तो आपला निर्णय आहे असे उत्तर दिले आहे. इतकेच नाही तर विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुखांचे मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे आरोप यावेळी साळवी यांनी केले आहेत. यावर तुम्हाला काय जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला भाजपमध्ये जायचं असेल तर जा असे राजन साळवींना सुनावल्याची माहिती आहे.