शरद पवार बाजूला बसलेले, आमदार फोडाफोडीवर मुख्यमंत्री म्हणतात….
विधान मंडळ कामकाजाचं हँडबूक म्हणजेच विधानगाथा (VIdhangatha) हे पुस्तक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं (VIdhangatha) प्रकाशन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुंबई : विधीमंडळ कामकाजाची नीट ओळख होऊ शकते असं पुस्तक काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलंय. विधान मंडळ कामकाजाचं हँडबूक म्हणजेच विधानगाथा (VIdhangatha) हे पुस्तक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं (VIdhangatha) प्रकाशन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ,माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह विविध नेत्यांची उपस्थित होती.
या कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही. आम्हाला देखील माहित नसतं आमच्या पक्षात कोण येणार आहे. आम्हाला पेपरवाल्यांकडूनच दुसऱ्या दिवशी समजतं. त्यामुळे अलीकडच्या काळात कुणासोबत फोटो काढायलाही भीती वाटते, असं मुख्यमंत्री म्हणाले.
शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
देशाच्या संसदेने, राज्याच्या विधीमंडळाने याआधी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे ऐकली आहेत. शेकाप नेते उद्धवराव पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस विषयाची चांगली तयारी करून मांडणी करत. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अभ्यासपूर्वक मांडणी करतात, अशा शब्दात अनेक वर्षांच्या संसदीय कामकाजाचा अनुभव असलेल्या पवारांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.