लंकेतील सीतेची सुटका, गीतेचा उपदेश आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान संविधानातच; देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
आचार्य कृपलानी यांनी पहिले भाषण केले होते. एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुतांश ड्राफ्ट तयार केला.म्हणून संविधानाचे शिल्पकार हे बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवशी भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधानाचा गौरव करण्यासाठी सभागृहात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधान जगातील सर्वात चांगले संविधान आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मी संविधानाला व संविधान सभेला नमन करतो. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन करतो. संविधानाने सामाजिक, आर्थिक व राजकीय क्रांती आणली. बाबासाहेबांमुळे रक्तविरहित क्रांती आणली. संविधान तयार करताना उच्च भारतीय मूल्यांचा विचार करून त्यावर आधारित संविधान बाबासाहेबांनी तयार केले. १९४६ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ एका निर्णायक वळणावर पोहचली, तेव्हा इंग्रजांनी कॅबिनेट मिशन पाठवले. त्या कॅबिनेट मिशनने रिपोर्ट दिला की स्वातंत्र्य भारताचे संविधान तयार करावे लागेल. त्यावेळी संविधान सभा निर्माण करण्याचा निर्णय झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संविधानाचे शिल्पकार हे बाबासाहेब आंबेडकर
“१९३५ चा कायदा हा एक प्रकारे संविधान होते. पण ते इंग्रजी राज्य चालवण्यासाठी भारतीय लोकांचा सहभाग असावा यासाठी होते. ते आपण संविधानात परावर्तित केले नाही. संविधानाने एकएक आर्टिकलवर चर्चा केली आहे. मग स्वीकार केला आहे. १६५ दिवस ही चर्चा झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी पहिली चर्चा तर २४ जानेवारी १९५० रोजी शेवटची चर्चा झाली. तीन वर्षे हे काम सुरु होते. जगाच्या पाठीवर सर्वात प्रदीर्घ काम ज्या संविधान सभेने काम केले ती ही भारताची संविधान सभा होती. ३८९ सदस्य यामध्ये होते. ९ डिसेंबर १९४६ ला पहिले अधिवेशन झाले. तेव्हा सुरुवात हा वंदे मातरम् गीताने झाली. आचार्य कृपलानी यांनी पहिले भाषण केले होते. एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुतांश ड्राफ्ट तयार केला.म्हणून संविधानाचे शिल्पकार हे बाबासाहेब आंबेडकरांना मानतो”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
“आता संविधानमध्ये बदल झाला आहे. मसुदा वेळी ७ हजारांहून अधिक सुधारणा सुचविल्या होत्या. त्यातील २ हजार स्विकारल्या. त्यानंतर १०६ सुधारणा झाल्या. ओबीसी आयोगाला संविधान दर्जा, जीएसटी साठी झालेली सुधारणा ही नुकतीच झालेली आहे. महिलांना संसदेत व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याची सुधारणा आहे. देशाला दिशा देणाऱ्या या सुधारणा मोदी सरकारच्या काळात झाल्या आहेत. राजकीय नेते बदलले, राजकीय राजे बदलले. पण समाज एक राहिला. त्यातील पारंपरिक भाव एक राहिला. त्यामुळे राजकीय व्यवस्था तयार करायची होती, तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणारे संविधान तयार झाले. भारताची निती काय, हे संविधानाची उद्देशिका सांगते”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संविधानात सर्वात मोठी ठेव ही लोकशाही
“ही उद्देशिका आपली आहे. आम्ही भारतीय लोक सांगतो म्हणून हे जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. पाश्चिमात्य देशातील हे संविधान नाही. ठिकठिकाणी बंधुता हे शब्द दिसतात. हे गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आहे. संधीची समानता त्यांनी दिली. जात, धर्म यांच्या आधारे संधी दिली जाणार नाही. सर्वांना समान संधी दिली जाईल. लंकेतील सीतेची सुटकादेखील संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दाखवलेली आहे. ती यासाठी दाखवलेली आहे की आम्हाला या संविधानाचा नारी सन्मानासाठी वापर करायचा आहे, हे त्यातून अभिप्रेत करण्यात आलेले आहे. गीतेचा उपदेश देखील याच संविधानात दाखवला आहे. या तत्त्वांवर उभं राहिलेलं हे संविधान आहे. या संविधानात सर्वात मोठी ठेव ही लोकशाही आहे”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा
“महात्मा गांधी नेहमी म्हणायचे रामराज्य आणायचे आहे. राजा जेव्हा भेदभाव करत नाही, त्याला रामराज्य म्हणतात. समाजातील छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांना शक्ती राजा देतो त्याला रामराज्य म्हणतात. हे पूर्णतः भारतीय मूल्यांवर तयार केलेले संविधान आहे. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतीमान चक्र आहे. काळाच्या बरोबर चालण्याचे धैर्य दाखवले नाही, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा आहे. म्हणून अंतिम भाषणात बाबासाहेब म्हणाले.””दोन घटकांनी टीका केली. एक कम्युनिस्ट व समाजवादी पार्टी, कम्युनिस्टांना संविधानातून हुकुमशाही अपेक्षित होती. संविधानातील मुलभूत अधिकार हे हवे होते. नानाभाऊ आता काय वेगळे सुरु आहे. देशातील प्रमुख संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. देशातील अशा संस्था बदनाम करायच्या, का तर आपण सत्तेत येऊ शकत नाही म्हणून. संविधानाने मुलभूत हक्क आहेत. कायद्यासमोर समानता आहे. धर्म, भेद यावरून भेदभाव करता येणार नाही. सामाजिक समानता, समान संधी, आर्टिकल १५ मध्ये भेदभाव करता येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले. पण एखादा समाज जर मागे राहिला असेल तर शैक्षणिक आरक्षण तरतूद केली. संधीची समानता आपण म्हणतो याचा अर्थ ज्यांच्यावर अन्याय झालाय. कुठलेही लाभ मिळाला नाही. त्यांना जन्मापासून सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या सोबत स्पर्धा करायला लावली तर तो अन्याय असतो”, असे ही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.