
विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची आज निवड झाली. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. “महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्य व मातीशी ज्यांची नाळ जोडली आहे, असे अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली त्यांचे अभिनंदन करतो. अण्णा म्हणजे मोठा भाऊ” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “अध्यक्ष पदावर नार्वेकरांसारखा विधीज्ञ बसलेला असताना, त्यांच्यासोबत वेगवेगळी भूमिका बजावणारे सदस्य काम करणार आहेत. आपला अनुभव एक विधीज्ञ म्हणून आहे, त्यानुसार आपल्या दोघांच्या समन्वयातून महाराष्ट्राला निश्चितपणे न्याय मिळेल” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
“सभागृहातील सर्व सदस्य व विशेषतः विरोधी पक्षांचे आभार मानतो, त्यांनी ही निवड बिनविरोध केली. अण्णांना विनंती करतो, या खुर्चीवर दोन्ही कान शाबूत ठेवावेत. डावीकडील बाजूचे ऐका, पण इकडचे पण ऐका. झिरवळ साहेब गंमतीने म्हणायचे मला डाव्या कानाने ऐकू येत नाही. त्यामुळे दोन्ही कानाने ऐका. विरोधी पक्षाला आता संधी नाही. विरोधी पक्ष असमाधानी असतो, समाधानी झाला तर तो विरोधी पक्षच नाही. त्यामुळे तुम्ही असमाधानी राहा” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षनेते पदाबाबत फडणवीस काय म्हणाले?
विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं. “बाजुच्या खुर्चीचा निर्णय ज्यादिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल. तोपर्यंत बाजुची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या” असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड नाहीच का? अशी चर्चा सुरु झालीय.
भास्कर जाधव यांचं मत काय?
विरोधी पक्षनेते पदासाठी ज्यांचं नाव चर्चेत आहे, त्या भास्कर जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “विरोधी पक्ष नेत्याची निवड करायची नसेल, तर सरकारने जाहीर करावं. आम्ही आमच्याकडून प्रयत्न केला. अध्यक्षांना पत्र दिलं. सरकारकडे बहुमत आहे, तरी सरकार का घाबरतय?” असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.