सभेपूर्वी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी शिंदे आणि फडणवीस; फोटो व्हायरल
राज्यात लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुंबईसह 13 जागांवर पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. उद्या संध्याकाळी पाचव्या टप्प्याचा प्रचार संपणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि आपली भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्याचवेळात शिवाजी पार्क येथे सभा होणार आहे. महायुतीच्या या सभेसाठी लोक यायला सुरुवात झाली आहे. या सभेला मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत. त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या सभेत संबोधित करणार आहेत. काही वेळात ही सभा सुरू होणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. इथूनच हे तिन्ही नेते शिवाजी पार्कवरील सभेत उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत. या तिन्ही नेत्यांनी बंगल्याच्या पहिल्या माळ्यावरील गॅलरीत येऊन गर्दीला हात दाखवला. तिन्ही नेत्यांनी गॅलरीत उभे राहून हास्य विनोद केला. बराच वेळ हे नेते गॅलरीत उभे होते.
गर्दी वाढतेय
दरम्यान, महायुतीच्या सभेसाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीला संबोधित करणार असल्याने चारही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क मैदानात मोठी गर्दी केली आहे. अनेकजण तर कुटुंबकबिल्यासह आलेले दिसत आहेत. या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसणार आहे.
गोविंदाही शिवाजी पार्कवर
अभिनेता गोविंदाही शिवाजी पार्कच्या सभेसाठी आले आहेत. गोविंदा यांनी काही दिवसांपूर्वीच राजकीय इनिंगला सुरुवात केली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. तेही या सभेला आले आहेत. या सभेत गोविंदा यांचं भाषण होणार की नाही याचा सस्पेन्स कायम आहे.
पाचव्या टप्प्यासाठी जोर
राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. उद्या या पाचव्या टप्प्याचा प्रचार संपणार आहे. त्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. आज महायुतीने शिवाजी पार्क मैदानात एका संयुक्त सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला विक्रमी गर्दी होणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबईत पाचव्या टप्प्यातील सहाही जागांवर मतदान होणार आहे.