Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. आतापर्यंत अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल एक मोठी घोषणा केली आहे.
पुण्यात आजपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. पुण्यातील या कार्यक्रमावेळी केलेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल एक मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला.
“कॅबिनेटमध्ये मी सांगितलं होतं की रक्षा बंधनाच्या आधी हे पैसे पोहोचले पाहिजे. खातं चालतं की नाही हे बघायचं होतं. त्यामुळे एक रुपया टाकायचा सल्ला काहींनी दिला. पण अजितदादा फडणवीस यांनी सांगितलं तीन हजार टाका आणि ट्रायल रन घ्या. लाडक्या बहिणी सांगत असतात खात्यात पैसे आले. तेव्हापासून राखी बांधायचा कार्यक्रम सुरू झाला. बहिणींच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी नारी शक्ती आल्या आहेत. मी बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या. आम्हाला आधार मिळाला म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहील. उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही बळ दिलं तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील. दोन हजार होतील, अडीच हजार होतील, अडीच हजाराचे तीन हजार होतील. या सरकारची ताकद वाढली तर तीन हजारापेक्षा जास्त देण्याची ताकद आली तर आम्ही हात आखडता घेणार नाही. सरकार तुमचं आहे. देण्याची नियत लागते. दानत लागते. ती आमच्या सरकारकडे आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“आमच्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे. मोदींची लखपती दीदी योजना आहे. राज्यातही आपल्याला बहिणींना आत्मसन्मान मिळून देणार आहे. ज्या बहिणीच्या खात्यात पैसे गेले नसतील त्यांच्या खात्यात पैसे जाईल. ज्यांचं आधार लिंक राहिलं असेल त्यांनाही पैसे मिळेल. ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. ऑगस्टमध्ये अर्ज भरल्यावर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील. तुम्हाला दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा आहेर मिळणार आहे”, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.