बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आलेच कसे?; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज कोल्हापूरमध्ये होते. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी ते आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच्या आंदोलनावर भाष्य केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथील झालेल्या आंदोलनावर मोठं भाष्य केलं आहे. एखादी वाईट घटना घडल्यावर लोक स्वयंस्फूर्तीने आंदोलन करतात हे माहीत आहे. पण बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील पोस्टर्स आलेच कसे? केवळ लाडकी बहीण योजना बदनाम करण्यासाठीच रेल्वे रोको करण्यात आला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कोल्हापूर येथे आले असता मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा सवाल केला आहे.
आमच्या बहिणींना आधार देण्याचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला बहिणी स्वत: उपस्थित राहत आहेत. ही योजना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी आहे. या योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. बदलापुरातील आंदोलनाची पार्श्वभूमी पाहा. एखादं आंदोलन स्वयंस्फूर्तीने होतं. पण बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील बॅनर्स आले. योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केला. सात आठ तास लोकांना वेठीस धरणं हे कोणतं राजकारण आहे? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मी जजमेंट वाचून दाखवलं
कोर्टाने एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाली असं मी म्हणालो होतो. ते म्हणतात कुठे फाशी झाली? मी पुणे सत्र न्यायालयाचं जजमेंट आताच दाखवलं आहे. विरोधकांचं काहीही बोलायचं सुरू आहे. खोटं बोलायचं ही विरोधकांची वृत्ती आहे. त्यांच्या या वृत्तीला बहिणी त्यांना सडेतोड उत्तर देतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापुरात खंडपीठ करण्याची अनेक वर्षाची मागणी आहे. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमावेळी मुख्यन्यायाधीशांशी या संदर्भात चर्चा झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
घटनेच्या खोलाशी जाऊ
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही मीडियाशी संवाद साधला. कोल्हापूरमध्ये एका तरुणीची हत्या झाली आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. बिहारमधून हे कुटुंब आलं होतं. काल दुपारी त्या पीडितेच्या काकांनी मारल्यामुळे ती घराबाहेर पडली. ती घरी आलीच नसल्याने तिच्या घरच्यांनी रात्री 10 वाजता पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. सकाळी तिचा मृतदेह सापडला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. काही संशयितांना अटक केली आहे. चौकशी सुरू आहे. घटनेच्या खोलात जाऊन आरोपीला कठोर शिक्षा करू. बिहारच्या कुटुंबाला मदत करू, असं फडणवीस म्हणाले.