महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा काय घडणार? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
“काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओक्केमध्ये आहे”, हा आमदार शहाजीबापू पाटील यांचा डायलॉग प्रचंड गाजला. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडून आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबई असला तरी सूत्र थेट आसामाच्या गुवाहाटी येथून हालत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारत आपल्यासोबतच्या सर्व आमदारांना गुवाहाटीत नेलं होतं. तिथे काही दिवस प्रचंड अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडून आलं होतं. या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिरात जावून पूजा केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे आमदार देखील होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आता पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्याबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या मंदिरात पूजा करण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून कामाख्या मंदिर व्यवस्थापनाला महत्त्वाची माहिती
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री गुवाहाटीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज रात्री बारा वाजता कामाख्या देवीच्या मंदिरात पूजा होणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून कामाख्या देवी मंदिर व्यवस्थापनाला कळवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाची उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या यादीत कुणाकुणाची नावे असणार आहेत? याबाबतची उत्सुकता आहे. शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या वेळी निवडून आलेल्या जागांवर शिंदे गटाकडून कुणाला उमेदवारी दिली जाते का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, अशी माहिती दिली आहे. तर दुसरी यादी 26 ऑक्टोबरला जाहीर होईल, असं सांगण्यात आलं आहे.