Aurangabad | मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून औरंगाबादेत गोंधळ, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद, राजेंद्र जंजाळांचा आरोप काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 31 जुलै रोजी क्रांती चौकात सभा झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्टेजवर रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान त्यांनी भाषण केलं.
औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या औरंगाबादमधील सभेवरून शहरात चांगलाच वाद पेटलाय. आज पोलीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. शिंदे गटाचे कार्यकर्ते राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) आणि पोलीसांमध्ये आज वाद झाला. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत रात्री उशीरापर्यंत लाऊड स्पीकरवर (Loud speaker) भाषण केलं. त्यामुळे त्यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक आणि औरंगाबाद शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात वाद झाला. पोलीस निरीक्षक दराडे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप जंजाळ यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी विरोध केला. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम औरंगाबाद येथील सभेतूनच लाऊडस्पीकरचा मुदद्दा अधिक स्पष्टपणे मांडला होता. सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बंद झाले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्याच सभेत कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याची तक्रार दाखल झाली आहे.
राजेंद्र जंजाळ काय म्हणाले?
क्रांति चौक पोलीस स्टेशनचे निरीक्षक दराडे साहेबांचा फोन आला. तुमच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून पोलीस स्टेशनला या… असे सांगितले. रात्री १२ वाजेपर्यंत माईक चालू ठेवल्याचा तुम्ही गुन्हा दाखल करताय, पण तुमच्याच हद्दीत सकाळी चार वाजता अनेक भोंगे वाजत असतात त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, ही सामान्य नागरिक म्हणून माझी भावना आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड राग आला. भडकले. ते म्हणाले, तुम्ही आम्हाला शिकवू नका. यावेळी त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोपही राजेंद्र जंजाळ यांनी केला..
मुख्यमंत्र्यांच्या सभेवर कुणाचा आक्षेप?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 31 जुलै रोजी क्रांती चौकात सभा झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्टेजवर रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान त्यांनी भाषण केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाऊड स्पीकरद्वारे भाषण करून सर्वोच्च न्यायलायाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे, तसेच या ठिकाणी बेकायदेशीर जमावही उपस्थित होता, असं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. चिकलठाणा येथील रहिवासी अर्जदान आनंद कस्तुरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ते आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या सभेत सर्वोच्च न्यायावयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ सिंदे आणि आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.