मुंबई : राज्य सरकार कोराना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. याचबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी पाच वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत मख्यमंत्र्यांनी संपूर्ण 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात आणणं शक्य नाही, अशी भूमिका मांडली. तसेच आज लॉकडाऊन लागू केला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला (CM Uddhav Thackeray on Maharashtra lockdown).
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मांडलेले 14 महत्त्वााचे मुद्दे:
1) कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील.
2) आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे.
3) विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सुचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल.
4) आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे.
5) गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोप्पे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले हे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.
6) एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. युकेने दोन आधीच महिने कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर 12 ते 15 गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय .
7) कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये हि सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे.
8) सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे.
9) रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल.
10) कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो.
11) आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत.
12) एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल.
13) मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे.
14) सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे.
बैठकीत कोणकोण उपस्थित?
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सुचना मांडल्या. बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली (CM Uddhav Thackeray on Maharashtra lockdown).
मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा, आमचा त्यांच्या निर्णयाला पाठिंबा : अजित पवार
“आताच बैठक झाली. आताच काही सांगायचं नाही. सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली. सर्वांनी आपले मुद्दे मांडली. बैठक संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्ही तुमच्या निर्णयाच्या पाठीशी आहोत, असं सांगितलं”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
आम्ही लॉकडाऊन करण्याबाबत सांगितलंय, पण : नाना पटोले
“गेल्या वर्षाचा अनुभव फार भयानक आहे. या वेळेस ताटं वाजवू शकत नाही किंवा दिवेही पेटवू शकत नाही. देशाच योग्य प्रमाणात लसीकरण झालं असतं तर आज आपल्याला एवढ्या मोठ्या कोरोना उद्रेकाला सामोरे जावे लागलं नसतं. पण आता आपण लॉकडाऊन करु तर लोकांना मदत करण्याच्या विषयाला गांभीर्याने घेणं जरुरीचं आहे. कोरानाची चेन तुटली पाहिजे. ज्याचं जळतं त्याला कळतं. आज तरुणांता या आजारामुळे मृत्यू होतोय. त्यामुळे त्या परिवारांचं काय होतं असेल याची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन लागू करण्याबाबत सांगितलं आहे. पण गेल्या वेळी लागू केलेल्या लॉकडाऊनसारखा लागू करु नये. छोटे दुकानदारांना बघून, गरिब, होतकरुंचाही विचार करुन लॉकडाऊन करण्याबाबत सांगितलं आहे. याबाबत चर्चा अजून सुरु आहे”, असं काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
“आम्ही लॉकडाऊनची भूमिका घेतली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक, मात्र विरोधक अजूनही राजकारण करत आहे. आधी मदत मग लॉकडाऊन असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण सध्या जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्याची राज्यात परिस्थिती बिकट आहे. भयानक स्थितीला सामोरं जावं लागत आहे. आता ताटं आणि दीवे पेटवण्याची वेळ नाही. केंद्राने राष्ट्रीय महामारी घोषित केलीय. गुजरात हायकोर्टाने त्या सरकारला फटकारलं. पण महाराष्ट्रात राजकारण होत आहे. मदतीचा प्रश्न आहे, त्याला काँग्रेसचं समर्थन आहे. 20 लाख कोटींचा रुपया कुणाला मिळाला नाही. राज्याने विशेष पॅकेज तयार करावं. आम्ही केंद्राकडे बोट दाखवत नाही. मदतीची भूमिका राज्याची आहे. केंद्राने सर्वात मोठं पाप केलं, लसीकरणात भाजपविरोधी राज्यांना कमी लस दिली. रोज जवळपास ६ लाख लसीकरणाचं टार्गेट होतं. पण लसी अत्यल्प पुरवल्या. त्यावर आरोप केला राज्याने लसी खराब केल्या. उत्तर प्रदेशात ९ टक्के वेस्ट, महाराष्ट्रात ३ टक्के वेस्ट झाल्या. केवळ राजकारण सुरु आहे”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांची भूमिका काय?
“आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवायचा असेल तर कडक लॉकडाऊन करावा, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका दिसतेय. देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरलाय, लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या घटकांचा काय विचार केलाय, याबाबत प्लॅन केला नाहीत तर उद्रेक होईल, असं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा मान्य केला. अजित पवार यांनी सोमवारी हातावरती पोट असणाऱ्यांसाठी काय पॅकेज देता येईल, याबाबत विचार करु, असं म्हटलं आहे. पण त्यांनी एक अडचण सांगितली. ती अडचण बरोबर नाही. याबाबत नेमक्या संख्या नसतात. तर सगळे रिक्षाचालक, टॅक्सीचालक, घरकाम करणारे, फुटपाथविक्रेते रजिस्टर असतात. सगळे कामगार रजिस्टर असतात. त्यामुळे प्रश्न पडण्याचं काही कारण नसतं. इच्छाशक्ती असलं तर सगळं शक्य होतं”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
“मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियंत्रण आणण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काही प्रॅक्टिकल विचार केला असेल. व्यापार, छोटे दुकानदार यांचा विचार केला जावा. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे हे सर्वसामान्यांच्या पोटापाण्यासंबंधित आहे. सर्वसामान्यांना दुकान भाडं, कर्जाचा हफ्ता असतो. त्यामुळे सगळ्यांचा विचार केला पाहिजे”, असं मत त्यांनी मांडलं.
“दोन दिवसात मुख्यमंत्री विचार घेऊन निर्णय घेतील, अशी अपेक्षा. घरी बसवून शिवथाळीचे पॅकेट पाठवून देणार का घरात? पैसे नाही म्हणता आणि आमदारांना 2 कोटी कसे देता? एका वेळी 700 कोटी वापरायला मिळतील. 14 दिवसाचा कडकडीत लॉक डाऊन लावा म्हणणाऱ्या तात्याराव लहाणे यांचे काय जाताय. त्यांनी झोपडपट्टी मध्ये जाऊन गरिबांची अवस्था पहा”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
संबंधित व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध 8 की 14 दिवस?
रेमडेसीव्हिरची निर्यात थांबवा, पुढील महिन्यात एक लाख डोसची गरज: राजेश टोपे