संजय राऊत शरद पवार यांचे शिवसैनिक, गुन्हा दाखल होताच तक्रारदार राऊत यांच्याविरोधात म्हणाला…
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतांना त्यांची जीभ घसरली आहे. यावेळी संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.
चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath shinde ) यांच्यावर बोलतांना संजय राऊत यांची जीभ घसरली होती. त्यावरून नाशिकमधील शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार ( Yogesh Beldar ) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात कलम 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शाह ( Amit Shah ) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर पलटवर करत असतांना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केले होते.
संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे योगेश बेलदार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने संजय राऊत यांना आक्षेपार्ह विधान करणं चांगलंच भोवणार असल्याचे दिसत आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतांना त्यांची जीभ घसरली आहे. यावेळी संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.
त्यावरुन शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी पोलिसांत धाव घेतली. यावेळी योगेश बेलदार म्हणाले, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचं श्रद्धास्थान आहे.
संजय राऊत यांना उत्तर द्यायचं नाही असं नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलाल तर याद राखा असा दमही योगेश बेलदार यांनी भरला आहे.
माफी मागा नाहीतर नाशिकमध्ये फिरू देणार नाही असा इशारा देत संजय राऊत हे शरद पवारांचे शिवसैनिक आहेत आणि आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा शिवसैनिक काय असतो हे तुम्हाला दाखवून देऊ असा गर्भित इशाराही योगेश बेलदार यांनी दिला आहे.
अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असतांना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे तळवे चाटायला गेले होते पण निवडणूक आयोगाने दूध का दूध पानी का पानी केले आहे. असे शाह यांनी विधान केले होते.
हीच टीका ठाकरे गटाच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी अमित शाह यांच्यासहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केले असून ते त्यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला असून येत्या काळात राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.