चिमुकल्यावर गुंतागुंतीची ‘ओपन हार्ट सर्जरी’… उत्तर महाराष्ट्रात झाली अशी शस्रक्रिया आणि ती देखील मोफत…
आरुष वाघ या बालकाच्या हृदयाला मोठे छिद्र होते. याशिवाय त्याच्या फुप्फुसातील दाब देखील वाढलेला होता. त्यामुळे शस्रक्रिया करणे अवघड होते.
नाशिक : पालघर (Palghar) जिल्हयातील आरुष नावाचा चिमुकला. अवघ्या आठ महिन्यांचा आणि वजन 4 किलो 400 ग्रॅमचा. आरुषला जन्मताच हृदयाचा (Heart Surgery) गंभीर विकार झाला होता. त्यामुळे कुटुंबापुढे या जीवाला कसे वाचवायचे असा यक्ष प्रश उभा राहिला होता. त्यातच घरची परिस्थिती नाजुक असल्याने आरुषचे पालक मोठ्या संकटात होते. नाशिकच्या एसएमबीटी (SMBT) रुग्णालयाकडून उत्तर महाराष्ट्रात मोफत आरोग्य शिबिर घेतले जाते. त्यामुळे आरुषची शिबिरात तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या छातीत छिद्र असल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय बालकास श्वास घेण्यास त्रास होणे, कपाळावर घाम येणे, स्तनपानाला प्रतिसाद न देणे, वजन न वाढणे, वारंवार श्वसनमार्गाचा संसर्ग होणे, न्यूमोनिया होणे अशा बाबी आरुष वाघच्या पालकांनी सांगितल्या होत्या. त्यामुळे त्यावर शस्रक्रिया करावी लागेल असा सल्ला दिला होता.
एसएमबीटी रुग्णालयाकडून सातत्याने मोफत शिबिर ग्रामीण भागात घेतले जातात. विशेषतः आदिवासी भागात शिबिर घेतले जातात.
त्याच आरोग्य पथकाला आरुष वाघ हा चिमुकला हृदयविकाराने त्रस्त असल्याचे समोर आले होते.
आरुष वाघ या चिमूकल्याला हृदय विकाराच्या शस्रक्रियेसाठी एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वय, वजन कमी असताना गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान एसएमबीटीच्या डॉक्टरांवर होते.
हे आव्हान पेलत या चिमुकल्यावर नुकतीच यशस्वी शस्रक्रिया झाली असून चिमुकला सुखरूप घरी परतला आहे.
आरुष वाघ या बालकाच्या हृदयाला मोठे छिद्र होते. याशिवाय त्याच्या फुप्फुसातील दाब देखील वाढलेला होता. त्यामुळे शस्रक्रिया करणे अवघड होते.
मात्र, यशस्वी गुंतगुंतीची शस्रक्रिया झाली आणि त्यानंतर पाच दिवस आयसीयू विभागात उपचार आणि काळजी घेण्यात आली होती.
त्यानंतर आरुष वाघ या चिमूकल्याला डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी आरुषचे नातलग भावुक झाले होते.
आरुषचा नवा जन्म झाल्याची प्रतिक्रिया देत नातलगांनी मोफत शस्रक्रिया करून दिल्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनांचे आभार मानले आहे.
एसएमबीटी हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात धामणगाव-घोटी खुर्द येथे आहे.