मोठी बातमी! ‘मविआ’मध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच, दिल्लीमध्ये काँग्रेसनं बोलावली बैठक, घडामोडींना वेग
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुतीमध्ये भाजपकडून उमेदवारांच्या नावाची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.
मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे महाविकास आघाडीतील वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिल्लीमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गटानं घेतलेल्या भूमिकेवर या बैठकीत विचारमंथन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपची पहिली यादी जाहीर
दरम्यान दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवणार आहेत. तर कामठीमधून यावेळी टेकचंद सावरकर यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या या यादीमध्ये 99 उमेदवारांपैकी 13 जाग्यांवर महिलांना संधी देण्यात आली आहे. नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.