काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पडद्यामागे काय घडतंय?
महाराष्ट्र काँग्रेस विषयी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस हायकमांड सतर्क झालं आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अशीच फूट वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात पडली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं. तसेच ठाकरेंच्या अनेक शिलेदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांचा शिंदे गटासोबत जाण्याचा ओघ अजूनही सुरुच आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही खळबळजनक घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. हे प्रकरण सुद्धा निवडणूक आयोगात गेलं आहे. या सगळ्या घडामोडी लक्षात घेता आता काँग्रेस पक्ष सतर्क झाला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंतर आता काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांचं भाजपसोबत बोलणं सुरु असल्याचीदेखील चर्चा आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वृत्ताचं खंडन केलेलं आहे. काँग्रेसच्या इतर दिग्गज नेत्यांनीदेखील संबंधित वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. या नेत्यांचा काँग्रेस एकसंघ असल्याचा दावा आहे.
दिल्लीतील हायकमांडचं महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावणं
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडी पाहता दिल्लीतील हायकमांड देखील अलर्ट झालं आहे. कारण अजित पवार हे भाजपसोबत जाण्याआधी काही दिवसांपूर्वी त्याबाबतच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांचं स्वत: अजित पवार यांनीदेखील खंडन केलं होतं. त्यानंतर 2 जुलैला अचानक त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडताना महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा अंदाज पाहता काँग्रेसचे दिल्लीतील बडे नेते अलर्ट झाले आहेत.
काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावलं आहे. काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आला आहे. त्यामुळे थेट दिल्लीत पक्षातील बाबींवर चर्चा होणार आहे. केंद्रीय काँग्रेसने महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना दिल्लीत बोलावलं आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक येत्या 14 जुलैली दिल्लीत पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमधील नाराजीवर चर्चा होणार
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याची चर्चा सातत्याने समोर येत असते. कधीकधी ही धुसफूस जाहीरपणे समोर येते. तर कधीकधी दबक्या आवाजात याबाबत चर्चा होते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवायचं असेल तर अंतर्गत मतभेद बाजूला सारणं महत्त्वाचं असेल. याबाबतही या बैठकीत चर्चा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.