नाना पटोले यांचे मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठे विधान, म्हणाले “जाहीरपणे सांगतो…”
नाना पटोले यांना महाविकासाआघाडीचा मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा कोण असणार याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले.
Nana Patole on Maharashtra Chief minister face : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकाआघाडीत जोरदार मोर्चेंबांधणी सुरु आहे. त्यातच आता महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबद्दल विविध चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात आला होता. आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवेळी नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांसह महाविकासआघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांना महाविकासाआघाडीचा मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा कोण असणार याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले.
“मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही”
“आम्ही एक आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकमताने ठरवू. हे जाहीरपणे सांगतो. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे. मोदी आणि शाह यांचा विचार अंमलात आणणार आहोत. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे”, असे नाना पटोले यांनी म्हटले.
“महाराष्ट्र हे खपवून घेत नाही”
“त्यांनी महिन्याभरात २७८ निर्णय घेतले. अनेक महामंडळं जाहीर केले. फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यातील एक तरी महामंडळ सुरू आहे का, एकाला तरी निधी दिली का हे तपासलं पाहिजे. बंजारा समाजाच्या पोहरादेवीला मोदी आले. नगाराचा कार्यक्रम बाजूला राहिला. शरद पवार आपण अनेक योजना राबवल्या. कृषी मंत्री झाले. दर हफ्त्याला योजनांचा इव्हेंट करत नाही. मोदींना ते केलं. मोदींनी पोहरादेवीत राजकीय भाषण केलं. त्याला बंजारा समाजात प्रचंड राग आहे. राजकीय इव्हेंट केले जात आहे. महाराष्ट्र हे खपवून घेत नाही”, असेही नाना पटोलेंनी सांगितले.
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू द्या, मग आम्ही करु – उद्धव ठाकरे
यासोबतच उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल भाष्य केले. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू द्या. भाजपची दयनीय अवस्था झाली आहे. गद्दार आणि चोरांचा चेहरा मानत आहेत. त्यांच्या नेतृत्वात लढत आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती होणार आहे. आमच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अपेक्षित करत आहेत. ते सत्ताधारी आहे. त्यांनी त्यांचा चेहरा जाहीर करू द्या. आमचा आम्ही लगेच करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.