मोठी बातमी! काँग्रेसच्या महाअधिवेशनानंतर महाराष्ट्रात संघटनात्मक बदलाची शक्यता, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती
काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वादावर लवकरच पडदा पडेल, अशी आशा बाळगली जात आहे. पण त्याआधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) मोठ्या हालचाली घडण्याची दाट शक्यता आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वादावर लवकरच पडदा पडेल, अशी आशा बाळगली जात आहे. पण त्याआधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) मोठ्या हालचाली घडण्याची दाट शक्यता आहे. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. काँग्रेसमध्ये संघटानात्मक बदल होणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिलीय. “24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान रायपूरमध्ये काँग्रेसचं महाअधिवेशन होणार आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद मोठा नाही”, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकं काय सांगितलं?
“रायपूरला होणारं अधिवेशन हे 24,25 आणि 26 फेब्रुवारीला होणार आहे. मला वाटतं या अधिवेशनानंतर काही संघटनात्मक बदल होतील”, असं चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं.
“काही मतभेद असतील तर ते सोडवण्याची आमच्याकडे प्रक्रिया आहे. वाद फार काही मोठे आहेत, असं मला वाटत नाही. फक्त लोकांनी जाहीर वक्तव्य करणं टाळलं पाहिजे”, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहाचं कारण काय?
आमदार सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली होती. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही.
याउलट सत्यजीत तांबे यांनी अर्ज दाखल केला आणि सुधीर तांबे यांनी सत्यजीत यांना पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर झाला.
देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण
याशिवाय आपण भाजपचा देखील पाठिंबा मागू, असं सत्यजीत तांबे म्हणाले होते. तसेच या निवडणुकीआधी सत्यजीत यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आले होते.
यावेळी त्यांनी सत्यजीत तांबे यांना संधी द्या. नाहीतर आमचं त्यांच्याकडे लक्ष आहे, असं विधान केलं होतं. त्यामुळे वेगवेगळे राजकीय कयास बांधले जात होते.
सत्यजीत तांबे यांचे आरोप
याच सगळ्या चर्चांमुळे अखेर काँग्रेस हायकमांडने देखील तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत सत्यजीत तांबे निवडून आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला. आपल्याला चुकीचा एबी फॉर्म पाठवण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला.
नाना पटोले यांचं प्रत्युत्तर
सत्यजीत तांबे यांच्या आरोपांना नाना पटोले यांनीदेखील उत्तर दिलं. आपल्याकडे सर्व मसाला आहे. त्यामुळे कुटुंबातील वाद पक्षावर आणू नका आणि वादावर पडदा टाका, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं होतं.
बाळासाहेब थोरात यांचं हायकमांडला पत्र
दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवत नाना पटोले यांची तक्रार केली. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं आता कठीण होऊन बसलं असल्याचं ते पत्रात म्हणाले.
‘सामना’ अग्रलेखात नाना पटोलेंवर निशाणा
विशेष म्हणजे नाना पटोले यांच्यावर आज शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या ‘सामना’च्या अग्रलेखातूनही निशाणा साधण्यात आलाय. पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असता, असा दावा अग्रलेखात केला.
विजय वडेट्टीवार दिल्लीत
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आज दिल्लीत गेले आहेत. त्यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. याशिवाय काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन नाना पटोले यांच्याविषयी तक्रार केली होती.