अंगात निळा टी-शर्ट, वाहनांचा प्रचंड ताफा; राहुल गांधींकडून सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आरएसएसवर गंभीर आरोप केले आहेत.
परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांकडून आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या, त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. या आंदोलकांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण देखील होता. मात्र त्यांचा कोठडीतच मृत्यू झाला. सोमनाथ यांचा कोठडीत मृत्यू झाल्यानं वातावरण चांगलंच तापलं, याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. दरम्यान आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
राहुल गांधी वाहानांच्या प्रचंड ताफ्यासह आज परभणीमध्ये दाखल झाले, त्यांनी निळा शर्ट परिधान केला होता. त्यांनी आज परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाचं सांत्वन राहुल गांधी यांनी केलं. यावेळी सूर्यवंशी कुटुंब चांगलंच भावुक झालं. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.दरम्यान या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुला गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली, त्यांची हत्या झाली. मी सूर्यवंशी कुटुंबाला भेटलो. त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला, व्हिडीओ दाखवले. 99 टक्के नाही तर 100 टक्के पोलिसांनीच सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली. या तरुणाला केवळ यासाठी मारलं की तो एक दलित तरुण आहे, आणि तो संविधानाचं रक्षण करत होता. असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आरएसएसची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधारा आहे. ज्या लोकांनी हे केलं आहे, त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. मी यावर समाधानी नाही, या लोकांना मारण्यात आलं, हत्या केली. हे राजकारण नाही, तर न्यायाची गोष्ट आहे. लवकरात लवकर कारवाई करावी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.