नाना पटोले यांचीच डोकेदुखी वाढली, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र, कारण काय?
तांबे-थोरात विरुद्ध नाना पटोले हा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. यामध्ये थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाशिकमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे.
नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे विरुद्ध पटोले ( Tambe Vs Patole ) असा सुरू झालेला वाद आता थोरात विरुद्ध पटोले असा सुरू झाला आहे. त्यातच कॉंग्रेसमध्ये ( Congress ) दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील ( Nashik News ) काही पदाधिकाऱ्यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचेच काम केल्यानं कॉंग्रेसमध्ये तांबे यांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर नाराजी पसरली होती. त्यानंतर विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा देखील बाळासाहेब थोरात यांनी दिल्यानंतर कॉंग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. त्यातच आता नाशिकमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील तालुकाध्यक्षांसह 12 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ हा राजीनामा दिला असून तांबे पितापुत्रावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
तांबे-थोरात विरुद्ध नाना पटोले हा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. यामध्ये थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाशिकमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे.
नाशिकमधील राजीनामा सत्र पाहता तांबे आणि थोरात यांचा अधिक संबंध नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी राहिला आहे. त्यामुळे येत्या काळात राजीनामा सत्र सुरू झाल्यास नाना पटोले यांच्यासाठी ही बाब डोकेदुखी ठरू शकते.
पेठ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत अस्तानणं तालुकाध्यक्ष निवडीत नियम पाळले गेले नसून नाशिक पदवीधर निवडणुकीतही चुकीची वागणूक दिल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
याशिवाय थोरात आणि तांबे यांना कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाने अपमानास्पद वागणूक दिल्याने निषेधही व्यक्त केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसच्या निलंबन कारवाईचे पडसाद उमटू लागले आहे.
पेठ तालुका काँग्रेस, आदिवासी सेल काँग्रेस, सहकार सेल काँग्रेस, युवक काँग्रेस, , शहर काँग्रेस आणि एन. एस. यू. आयचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राजीनामा देत थोरात तांबे यांना समर्थन देण्यास सुरुवात केली आहे.
पेठ तालुक्यातील तालुका अध्यक्ष विशाल जनार्दन जाधव, युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदीप भोये, आदिवासी सेल कॉंग्रेस अध्यक्ष हरीदास रामदास भुसारे, एनएसयूआय अध्यक्ष ललित माधव मानभाव, सहकार सेल अध्यासख कुमार भोंडवे यांनी राजीनामा दिला आहे.
पेठ तालुका युवती काँग्रेस अध्यक्ष रेखा भारत भोये,पेठ शहर काँग्रेस कमिटी महिला शहराध्यक्षा रुक्मिणी प्रकाश गाडर, आसरबारी सरपंच गीता विशाल जाधव, पेठ तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस विकास काशिनाथ सातपुते, दिनेश देवराम भोये, कैलास दगडू गाडर यांनी राजीनामा पत्रावर सह्या केल्या आहे.