पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंची टीका
"ज्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती झाली, त्यांनी माझी काळजी करु नये", असा खोचक टोला कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.
शिर्डी : “ज्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती झाली, त्यांनी माझी काळजी करु नये”, असा खोचक टोला कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर शिर्डीतील मिरवणूकीत त्यांनी हे वक्तव्य केलं.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला रामराम केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आज प्रथमच ते आपल्या लोणी या मूळगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विखेंनी गावातील ग्रामदैवतेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची गावात मिरवणूकही काढण्यात आली. त्यावेळी विखे पाटलांनी हे वक्तव्य केले.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात काँग्रेसच्या जागांची संख्या 82 वरुन निम्मी म्हणजे 42 झाली. त्यामुळे त्यांनी माझी काळजी करु नये. आधी पक्षाचा विचार करावा, असा टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
माझ्यावर पक्षाने विश्वास व्यक्त करत कँबीनेट पद दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यास पात्र राहण्याचा मी प्रयत्न करीन, असेही ते यावेळी म्हणाले.
विशेष म्हणजे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर विखे पाटलांचा सुर बदलला पाहायला मिळाला. “राज्यात पडलेल्या दुष्काळवर बोलताना, दुष्काळी भागांची दाहकता बघून सरकार अपेक्षेपेक्षा जास्त मदत करत आहे,” असे ते म्हणाले. “विरोधात असताना माहितीच्या आधारे वरिष्ठ मंडळी काम करण्यास सांगत. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकार चांगले काम करतय” असंही राधाकृष्ण विखेंनी सरकारची पाठ थोपटली.